ज्या लोकांना अन्न असुरक्षिततेला ( कमी अन्न मिळणे) तोंड द्यावे लागते त्यांच्यात अकाली मृत्यूची जोखीम कर्करोग व इतर रोगांपेक्षाही १० ते ३७ टक्के जास्त असते असे मत एका अभ्यासात दिसून आले आहे. टोरांटो विद्यापीठाने कॅनडातील पाच लाख लोकांची माहिती गोळा करून हा निष्कर्ष काढला आहे. हे संशोधन कॅनडियन मेडिकल असोसिएशन नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून त्यात अन्न असुरक्षितता या निकषावर आधारित माहिती घेण्यात आली. यात लोकांच्या अन्न असुरक्षिततेचे वर्गीकरण कमी, मध्यम, अती तीव्र या रूपात करण्यात आले होते.

अभ्यासाअंती २५४६० लोक अकाली मरण पावल्याचे दिसून आले. त्यात ज्या लोकांना पुरेसे अन्न मिळाले नव्हते त्यांचा मृत्यू इतर अन्नसुरक्षित लोकांपेक्षा ९ वर्षे आधी झालेला दिसून आला. अन्नदृष्टय़ा सुरक्षित लोक ६८.५ वर्षे जगले तर अन्नाबाबत असुरक्षित लोक ५९.५ वर्षे जगले असे टोरांटो विद्यापीठाचे फेई मेन यांनी म्हटले आहे. कॅनडात २००८-२०१४ या काळात सरासरी आयुर्मान हे ८२ वर्षे होते. त्या वयाच्या आधी झालेले मृत्यू हे यात अकाली गृहित धरण्यात आले. ज्या लोकांमध्ये अन्न असुरक्षितता होती त्यांच्यात संसर्गजन्य व इतर आजारांनी होणारे मृत्यू हे दुप्पट होते.

अपुरे अन्न व मृत्यू यांचा संबंध यापूर्वीही काही संशोधनातून मांडण्यात आला होता पण त्यात मृत्यूच्या कारणांचा विचार करण्यात आला नव्हता. याचा अर्थ अन्न असुरक्षितता असलेल्या लोकांना सार्वजनिक योजनातून फारसा लाभ होत नाही असाही याचा एक अर्थ काढण्यात आला आहे. त्यामुळे अशा समस्यांमध्ये धोरणात्मक हस्तक्षेपाची गरज आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे.