‘केंब्रिज अॅनालिटिका’ डेटा लिक प्रकरणानंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना फेसबुकने अमेरिकेच्या सीनेटमध्ये उत्तरं दिली. यामध्ये, युजरची खासगी माहिती, त्याची आवड-निवड जाणून घेण्यासाठी त्याच्या कंम्प्युटरच्या की-बोर्ड आणि माऊसच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते अशी कबुली फेसबुकने दिली आहे.

म्हणजे, तुमचं फेसबुक कंम्प्युटरवर लॉग-इन असेल तर माऊसच्या प्रत्येक क्लिक आणि की-बोर्डच्या कोणत्या बटनाचा वापर तुम्ही करताय ही सर्व माहिती फेसबुकला समजत असते. याद्वारे युजर कोणत्या प्रकारच्या गोष्टींवर जास्त वेळ घालवतो, कोणत्या कंटेंटवर किती वेळ थांबतो याची माहिती फेसबुक घेतं. त्याद्वारेच युजरला जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुककडून ही कबुली देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती. तेव्हापासून फेसबुकवरील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आणि प्रायव्हसी पॉलिसीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेच्या सीनेटमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गला प्रश्न विचारण्यात आले. जवळपास २ हजार प्रश्न विचारण्यात आले होते. एकूण ४५४ पानांवर फेसबुककडून प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.