16 December 2017

News Flash

‘ही’ आहेत कोटा डोरिया साडीची वैशिष्ट्ये

गावाच्या नावावरुन देण्यात आले नाव

वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर | Updated: August 9, 2017 1:19 PM

कोटा साडी म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर येते ती लाल, केशरी, मरून अशा रंगाची साडी नेसलेली मारवाडी स्त्री. पण बहुतेकशा लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही साडी मूळची दक्षिण भारतातली आहे. राजस्थानात बनवल्या जाणा-या साड्यांपैकी एक म्हणजे कोटा डोरिया. डोरिया म्हणजे दोरा. कोटा या गावाच्या नावावरून या साडीला हे नाव देण्यात आले आहे. कोटाप्रमाणेच उत्तर प्रदेशातील मुहम्मदाबाद या गावातही ही साडी बनवली जाते. कोटा साडी कॉटन व सिल्क अशा दोन्ही प्रकारात मिळते. साडीवरती चौकोनी आकारात केलेले विणकाम प्रसिद्ध आहे.

वर म्हटल्याप्रमाणेच ही साडी दक्षिण भारतातील आहे. मूळ म्हैसूरची असल्यामुळे या साडीचे नाव मसुरिया असे होते. मुघल फौजेतील जनरल राव किशोर सिंग यांनी म्हैसूरच्या कारागिरांना कोटा गावात आणले. अठराव्या शतकात हे कारागिर कोटामध्ये स्थायिक झाले आणि त्यावरून साडीला कोटा मसुरिया हे नाव पडले.

कसे असते विणकाम?

कोटा साडीचे विणकाम अशा रितीने केलेले असते की, साडीवर चौकोनी नक्षी तयार होते. कांद्याचा रस आणि तांदुळाच्या पेस्टमध्ये कॉटन किंवा सिल्कचे धागे बुडवले जातात. यामुळे कोटा साडीचे विणकाम अतिशय मजबूत असते. चौकोनी नक्षीशिवाय या साडीवर भरतकामदेखील केले जाते. कधीकधी काठावर जरीकाम केले जाते. त्यामुळे साडी विशेष उठून दिसते. आजकाल साडीप्रमाणेच कोटा कापडाचे स्कर्ट, सलवार कमीजही बनवले जातात.

आता विविध रंगातही उपलब्ध

कोटा साडी मूळ पांढ-या किंवा ऑफ व्हाईट रंगात बनवली जात असे. बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार ही साडी उपलब्ध असलेल्या सर्व रंगात बनवली जाते. साडीच्या विणकामावरून आणि नक्षीकामावरून तिचे साधी कोटा साडी, छापील कोटा आणि जरीची कोटा साडी असे तीन प्रकार पडतात. साधी कोटा साडी कॉटनने विणलेली असते. विणकामाच्या खास पद्धतीमुळे चौकोनी नक्षीकाम दिसते. छापिल कोटामध्ये फुले व पानांचे नक्षीकाम छापलेले असते. तिसरा आणि सगळ्यात सुंदर प्रकार म्हणजे जरीची कोटा साडी. या साडीवर पारंपारिक पद्धतीनेच जरीकाम केलेले असते.

काळजी कशी घ्याल?

वजनाने हलकी आणि विशेषत: कॉटनमध्ये विणलेल्या या साडीची निगा राखणे अत्यंत सोपे आहे. थंड पाण्यात धुणे आणि सावलीत वाळवणे मात्र महत्वाचे. ही साडी उन्हाळ्यात वापरण्यासाठी अतिशय उत्तम आणि साधी असल्यामुळे रोज वापरायला चांगली.

वल्लरी गद्रे, फॅशन डिझायनर

First Published on August 9, 2017 1:19 pm

Web Title: traditional sari cota doria shravan special specialty of different sari