गृहकर्ज घेताना आपण अनेकदा गोंधळलेल्या स्थितीत असतो. कोणत्या बँकेचे घ्यावे, त्याची मुदत काय ठेवावी यांसारख्या अनेक गोष्टींबाबत आपल्या मनात संभ्रम असतात. मात्र व्याजदराबाबत काही गोष्टींची आधीपासून माहिती असणे आवश्यक असते. गृहकर्जाच्या आर्थिक परिणामांत सकारात्मक आणि नकारात्मक बाबीही असतात. गृहकर्जाच्या मोठ्या मुदतीमुळे अशी परिस्थिती ओढावू शकते की चालू व्याजदर तुमच्या गृहकर्जाच्या दराहून लक्षणीयरित्या कमी किंवा जास्त असू शकते. काही काळाने आपण तेच कर्ज कमी व्याजदराने मिळत असल्यास दुसऱ्या एखाद्या बँकेकडे हस्तांतरित करण्याचा विचार करतो. ज्यामुळे आपल्याला भराव्या लागणाऱ्या व्याजाची रक्कम कमी होणार असते. मात्र असे करतानाही योग्य तो विचार आणि ताळेबंद बांधून निर्णय घेणे गरजेचे असते. आता कमी व्याजदराचे लाभ मिळवण्यासाठीच्या सर्वोत्तम अवस्थेची निवड कशी करता येईल, याविषयी समजून घेऊया.

अशाप्रकारे कर्ज हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला नव्या बॅंकेचा शोध घ्यावा लागतो. ही नवी बँक आपला अर्ज नव्याने स्वीकारते. यामध्ये नव्या बँकेकडून आधीच्या बँकेने दिलेल्या कर्जाची उर्वरित मुद्दल भरली जाते. आता ग्राहकाला आपले कर्जाचे हप्ते नव्या बँकेमध्ये भरावे लागतात. तेही कमी व्याजदराने. त्यामुळे आपल्यावरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. ही पद्धत म्हणजे गृहकर्जासाठी पुन्हा संपूर्ण निधीपुरवठा करण्यासारखी असते. मात्र नवीन बँकेकडे कर्जाचे हस्तांतरण करण्यासाठी आधी कर्ज घेतलेल्या बॅंकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. बँक तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि तुमच्या उरलेल्या कर्जाच्या रकमेचे तपशील देते.

६० वर्षांपासून ती महिला आहे उपाशी

नवीन बँकेकडे एनओसी आणि उरलेल्या कर्जाच्या रकमेचे तपशील सुपूर्द केल्यानंतर, कर्ज मंजूर झाल्यास जुन्या बँकेकडे भरणा केला जातो. असे करणे नेहमीच लाभदायक असते असे नाही. मात्र व्याजाच्या रकमेत जास्त फायदा होत असल्यास ते फायदेशीर ठरु शकते. तुम्ही कर्जदार म्हणून त्यास कर्ज हस्तांतरण मानत असलात, तरी नवीन बँक त्यास नवीन कर्जाचा अर्ज म्हणून गृहित धरत असते. परिणामी नवीन बँक कर्ज प्रक्रिया शुल्क, कायदेशीर शुल्क, मूल्यांकन शुल्क, इतर मुद्रांक शुल्क आणि संबंधित शुल्क आकारते ज्यामुळे कर्जाची किंमत वाढण्याची शक्यता असते.

हा पर्यायही ठरु शकतो उपयोगी

गृहकर्ज हस्तांतरित करण्याच्या तुलनेत, तुमच्या आधीच्याच बॅंकेशी पुन्हा वाटाघाटी करणे हा कधी कधी चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही कसूर न करता नियमितपणे हप्ते भरत असाल आणि तुमचा ऋण (क्रेडिट) इतिहास चांगला असेल व बँकेशी सक्रिय संबंध असतील, तर तुमच्या कर्जासाठी व्याजदर बदलण्याचा बँक विचार करू शकण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत तुमच्या आर्थिक प्राथमिकतेनुसार, तुमच्या कर्जाचे हप्ते कमी करण्याचा किंवा कर्जाची मुदत वाढवून प्रभावीपणे हप्त्यांची रक्कम कमी करण्याचा पर्याय असतो. कोणत्याही अतिरिक्त कर्ज प्रक्रिया शुल्कांशिवाय असे पुन्हा वाटाघाटी करून मिळवलेले कर्ज दीर्घकाळात खिशाला जास्त परवडणारे ठरू शकते.

– अधिल शेट्टी

(लेखक बँक बाजार डॉट कॉमचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत)

मेंदूवरील शस्त्रक्रियेदरम्यान ती खेळत होती मोबाईल गेम