रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळला असाल तर एक छोटीची पिकनिक किंवा भटकंती नक्कीच केली पाहिजे. पूर्वी घरातली मोठी मंडळी मुलांना बागेत, एखाद्या नातेवाईकाकडे किंवा डोंगरमाथ्यावर घेऊन फिरायला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार फिरण्याची ठिकाणंही बदलली आहेत. आजकालचे पालक मुलांना विदेशामध्ये फिरायला घेऊन जातात. मात्र सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धकाधकीच्या जीवनामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.त्यातच सध्या करोना या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. केवळ चीनच नव्हे तर हळूहळू हा रोग अन्य देशांमध्येही पसरत चालला आहे. त्यामुळे जर तुम्ही विदेशवारीची योजना आखली असेल तर आरोग्याचाही नीट विचार केला पाहिजे. कोणताही विदेश दौरा करत असताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच ‘इंटरनॅशनल एसओएस’ या संस्थेने विदेशात कामानिमित्त प्रवास करताना स्वतःच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केलं आहे.

१. प्रवास करत असताना आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष ठेवा. कोणत्याही व्यक्तीला आजार असल्याचं जाणवल्यास त्याच्यापासून दूर राहणं पसंत करा.

२. विदेशात १० पेक्षा जास्त दिवस राहणार असाल तर तेथे पोहोचल्यानंतर पहिले १४ दिवस आरोग्याकडे नीट लक्ष द्या.

३. प्रकृती ठीक नसेल तर शक्यतो प्रवास करणं टाळा.

४. प्राण्यांशी थेट संपर्क येईल अशा ठिकाणी जाणं टाळा.

५. प्राण्यांची किंवा मानवी विष्ठा असलेल्या दूषित पृष्ठभागास स्पर्श करणं टाळा.

६. गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका

७. आजारी असलेल्या व्यक्तीपासून शक्यतो लांब रहा.

८. स्वत: स्वच्छता बाळगा. सार्वजनिक ठिकाणी चेहरा, डोळे यांना हाताने स्पर्श करु नका. बाहेरुन घरी आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.

९. आहारात अंड्याचा समावेश करा.

१०. सर्दी,खोकला झाल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा.

११. ताप आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१२ शिंकण्याने किंवा खोकल्याने इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून तोंडाला रूमाल किंवा मास्क लावा.

१३. वयस्कर व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या