News Flash

‘वॉटर थेरपी’चा ट्रेण्ड

दोन ते तीन लिटर पाणी एका वेळी पिण्याची चूक करू नये.

पाणी हे जीवन आहे. ते स्वच्छ आणि आरोग्यदायी असायला हवे!

खावे नेटके
पल्लवी सावंत – response.lokprabha@expressindia.com

इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे सतत वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. आरोग्याविषयी जागरूक असलेली मंडळी त्यातले आरोग्यविषयक ट्रेण्ड वेचून घेऊन आपलेसे करतात. ‘वॉटर थेरपी’ हा अशापैकीच एक प्रकार आहे.

श्रीयाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मित्र-मत्रिणी तिच्या घरी जमलो होतो. कोण काय खाणार वगरे विषय सुरू असताना शुभम मात्र अगदीच वेगळ्या मूडमध्ये दिसला. म्हणाला, ‘मला फक्त एखादं सूप.’

मी शुभमला म्हटलं ‘का रे?’

‘अगं हो, मी सध्या वॉटर थेरपी करतोय. त्याने डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि काही प्रकारचे कर्करोगसुद्धा बरे होतात म्हणे’

‘पण मग तू का करतोयस वॉटर थेरपी?’

‘का म्हणजे करायला हवं.. आपण तंदुरुस्त राहायला हवं. कायम तूच सांगत असतेस ना!’

‘शुभम, अरे मला वाटलं तुला कोणत्या आजाराशी संबंधित काही चिन्हं वगरे आढळली आहेत कीकाय’ श्रिया म्हणाली.

‘ओह नो नो; आजार होऊ नयेत म्हणून करतोय मी! फक्त पाणी आणि जास्तीत जास्त पाणी असणारे पदार्थ दिवसभरात पितो. खूप फ्रेश वाटतं आणि ते डिटॉक्सिफाियगपण आहे.’

‘म्हणजे नक्की काय करतोयस? कोणी सुचवलं हे?’ माझा साहजिक प्रश्न!

‘कोणी सुचवलं नाही गं! माझा एक कलीग करतोय. म्हटलं करू या आपणपण.’

‘असं आहे होय, तू एकदम पीएच. डी. केल्यासारखं बोलायला लागलास रे शुभम’ श्रियाने तेवढय़ात खोचक शेरा मारला. ‘तूपण करून बघ मिस परफेक्ट डाएट!’ तो हसत हसत म्हणाला.

वॉटर थेरपी या नावावरूनच आहारातील पाण्याचे महत्त्व आणि त्या भोवताली असणारे वेगवेगळे प्रयोग यांचं भलंमोठं जाळं डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागलं.

आहार नियमन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ‘खाणे-पिणे -जगणे’ या तीन मूलभूत गरजांवर आधारित असलेले शास्त्र. आहार नियमन करताना पाणी नक्की किती प्यावं आणि कसं प्यावं ? नेमकं काय करायचं ? कुणी सांगतं पाणी भरपूर प्या, कुणी सांगतं पाणी आवश्यक तेवढंच प्यायला हवं. नेमकं काय करायचं? अलीकडे पाणी शुद्ध असतं का ? मग अशुद्ध पाणी शुद्ध का करायचं? उकळलेलं पाणी शुद्ध आहे याची काय खात्री? पाणी कशासाठी प्यायचं? घरच्याघरी साध्या सोप्या पद्धतीने पाणी शुद्ध कसं करून घ्यायचं? असे अनेक प्रश्न पडलेले असतात.

पाणी पिण्याचे फायदे :

 • मानवी शरीरात किमान ७० टक्के पाणी असते. शरीरातील पेशींमध्येदेखील पाण्याचा अंश असतो.
 • उत्तम रक्ताभिसरणासाठी पाणी महत्त्वाचे आहे.
 • अन्नपदार्थातून मिळणारी जीवनसत्त्वे रक्तपेशींद्वारे वाहून नेण्याचे काम पाणी करते.
 • पाण्यामुळे मलमूत्र विसर्जन प्रक्रिया सोपी होते.
 • पाणी शरीरातील संप्रेरकांवर नियंत्रण ठेवते.
 • शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते.
 • अन्न पचण्यासाठी लाळग्रंथी, आम्ल आणि रसायने यांचा समतोल राखते आणि त्याद्वारे पचनक्रिया सोपी करते
 • शरीरात आद्र्रता राखते.
 • शरीरातील अवयवांसाठी वंगणाचे काम करते.

आहारशास्त्रानुसार तुम्ही जितक्या उष्मांकाचा आहार घेता तितके पाणी पिणे अत्यावश्यक आहे. म्हणजे एका उष्मांकाला एक मिली पाणी असे प्रमाण गरजेचे आहे.

आयुर्वेदात पावसाच्या पाण्याचे महत्त्व खूप आहे. परंतु सध्याच्या जीवनशैलीत पहिल्या पावसाचे पाणी साठविणे आणि पिणे या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्याच आवाक्यातील नाहीत. मग शुद्ध पाणी प्यायचे तरी कसे?

 • पिण्याचे पाणी उकळून ते गार करून प्यावे.
 • तांब्याच्या भांडय़ात पिण्याचे पाणी साठवून प्यावे.
 • माठातील पाणी रोज बदलावे.
 • प्लास्टिकच्या भांडय़ात पाणी साठवून ठेवू नये.
 • तहान लागेपर्यंत वाट पाहू नये.

गरम पाणी पिणे उत्तम की साधे पाणी?

 • कोमट पाणी पिणे कधीही उत्तम, परंतु अतिगार पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाब आहे त्यांनी सकाळी उठून त्वरित गरम पाणी पिणे टाळावे. तसेच सतत गार पाणी पिणेदेखील टाळावे. अतिशीत पाण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवर ताण येऊ शकतो.
 • बराच वेळ प्लास्टिकच्या (कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या) बाटलीत साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळावे. बरेचदा आपण प्रवासात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो. त्याऐवजी काचेची, तांब्याची किंवा स्टिलची बाटली वापरावी.
 • अगदीच पर्याय नसल्यास प्रवासात पिण्याच्या पाण्यात नागरमोथा वनस्पती किंवा तुळशीची पाने टाकून पाणी प्यावे त्यामुळे पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होऊ शकतो
 • वजन कमी करण्यासाठी सकाळी िलबू-मधाचे पाणी पिणाऱ्यांनी या पाण्याची सवय करून घेऊ नये. काही कालावधीनंतर या पाण्यामुळे दातांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 • कचेरीत काम करणाऱ्यांनी पाण्यात तुळशीची पाने, पुदिना, एखादी िलबाची फोड टाकावी आणि ते पाणी प्यावे. याच पाण्यामध्ये सुंठ पावडर किंवा काकडी, सब्जाच्या बिया, दालचिनी यापकी कोणतेही पदार्थ टाकल्यास पाण्याची चव वाढते. नुसते पाणी पिणे कंटाळवाणे होते. त्यावरचा हा उपाय आरोग्यदायीदेखील आहे. या पावडर आणि पानांचा आणखी उपयोग असा की, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
 • मधुमेह आहे त्यांनी दालचिनीची किमान एक काडी प्यायच्या पाण्यात नियमित वापरावी.
 • उच्च रक्तदाब आहे त्यांनी पिण्याच्या पाण्यात तुळस किंवा सब्जाच्या बिया किंवा काकडी याचा समावेश केल्यास फायदा होतो.
 • याव्यतिरिक्त आद्र्रता राखण्यासाठी आद्र्रता जास्त असणारी द्रवे पिणेदेखील हितकारक आहे. उदाहरणार्थ :
 • उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पर्यायाने पाण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा ताक, कैरीचे पन्हे, नारळपाणी, उसाचा रस या पेयांचा जरूर समावेश करावा. तापमानात होणारे बदल पाहता अतिउष्ण वातावरणात पाणी पिणे हितकारकच ठरते.
 • पाणी कायम घोट-घोट प्यावे. घटाघट पिऊ नये.
 • जेवणाआधी किंवा जेवणानंतर किमान ३० मिनिटे वेळ ठेवून पाणी प्यावे. जेवताना अन्न चावून चावून खावे आणि आवश्यकता वाटल्यास कमी प्रमाणात पाणी प्यावे.
 • काही आजारांमध्ये शरीरातील पाणी कमी होते तेव्हा गूळपाणी किंवा गुलकंद आणि पाणी प्यावे. घशाला कोरड पडेपर्यंत थांबू नये.
 • पोट दुखत असेल तर त्वरित पाणी पिऊ नये. काही विकारांमध्ये द्रवपदार्थाचे प्रमाण अत्यंत कमी करावे लागते तेव्हा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ प्यावेत.
 • मधुमेहासारख्या आजारांमध्ये औषधांमुळे लघवी होण्याचे प्रमाण अधिक असते. अशा रुग्णांनी एका वेळी भरपूर पाणी पिणे आरोग्याला हानीकारक ठरू शकते.
 • ज्यांना व्यायामानंतर प्रथिनयुक्त पावडर प्यायची आहे त्यांनी ३० ग्राम पावडर सोबत किमान ३०० मिली पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायाम करताना अधूनमधून घोट-घोट पाणी प्यावे. एकदम अर्धा लिटर पाणी संपवू नये.
 • आहारात मांसाहारी प्रथिनांचा समावेश असल्यास सोबत काकडी, टोमॅटो, िलबू यांचा समावेश जरूर करावा आणि किमान एक ग्लास पाणी जरूर प्यावे.
 • शीतपेयांमधील पाणी हे अतिरिक्त साखर आणि रासायनिक द्रव्यांनी भरलेले असल्यामुळे शीतपेये टाळणे कधीही उत्तम!
 • ऋतुमानानुसार आद्र्रता असणारी फळे खाणे कधीही उत्तम! किलगड, डािळबं, पपनस, द्राक्षे, संत्री, हिरवे किंवा लाल काजूचे फळ, स्टारफ्रुट, स्ट्रॉबेरी, करवंद, ताडगोळा यांचे सेवन करावे.

आता वळू या वॉटरथेरपीकडे!

वॉटरथेरपीमध्ये असे सांगितले जाते की, सकाळी उपाशीपोटी एका वेळी किमान ६०० ते १५०० मिली पाणी प्यावे. म्हणजे आधी चार ग्लास पाणी प्यावे त्यावर दोन ग्लास पाणी प्यावे. आणि त्यानांतर एक तास काहीही खाऊ नये. अनेकांनी वॉटरथेरपी सोयीस्करपणे आपलीशी केली आहे.

उदाहरणार्थ :

 • दिवसभरात फक्त पाणी आणि सूप किंवा इतर द्रवपदार्थ पिणे.
 • जेवणाआधी एक तास एक लिटर पाणी पिणे.
 • दर दोन तासांनी अर्धा लिटर पाणी पिणे.
 • कोणतेच आहारशास्त्र या पद्धतीचे समर्थन करत नाही.
 • मुळात सकाळी उठल्यावर इतके पाणी एका वेळी पिणे कधीच योग्य मानले जात नाही. कारण त्याने काही लोकांमध्ये शारीरिक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. ज्यांना इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम आहे त्यांचा त्रास बळावू शकतो.
 • सायनसचा त्रास असणाऱ्यांनीदेखील सकाळी उठून किंवा एका वेळी जास्तीत जास्त पाणी पिणे टाळावे.
 • गार पाणी प्यायल्याने तहान भागल्यासारखे वाटते; परंतु पुन्हा शोष पडतो. त्यामुळे कधीही साधे पाणी किंवा कोमट पाणी पिणे उत्तम!
 • शारीरिक स्वास्थ्यासाठी किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे कधीही उत्तम. मात्र ते एका वेळी पिण्याची चूक करू नये.
 • पाणी हे जीवन आहे. ते स्वच्छ आणि आरोग्यदायी असायला हवे!

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 4:42 pm

Web Title: trend of water therapy
Next Stories
1 हनुमान जयंती: या दैवताचा उगम काय, त्याचा विकास कसा झाला, साहित्यात त्याचे स्वरूप काय?
2 डोळ्यांच्या संरक्षणासोबत फॅशनही, उन्हाळ्यात वापरा ‘हे’ सनग्लासेस
3 सायनसच्या आजारावर ‘हे’ आहेत उपाय
Just Now!
X