तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

मुलांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास आढळतात ते टी-शर्ट्स. आता त्यातही वैविध्य आलंय. पार्टी, कार्यक्रम, पिकनिक, जिम अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाताना घालण्यासाठी हवेत असेच वैविध्यपूर्ण टी-शर्ट्स!!

टी-शर्ट म्हणजे प्रत्येक मुलांच्या वार्डरोबमधले अविभाज्य कपडे. एखादा मुलगा फक्त शर्टच वापरतो; असं तुम्हाला क्वचितच सापडेल. फक्त घरी टी-शर्ट वापरणारीही अनेक मुलं आहेत. घरी का असेना; पण ते टी-शर्ट वापरतातच. युनिसेक्स असणारे (म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकतात असे), वापरायला सोपे, कम्फर्ट देणारे हे टी-शर्ट पहिल्यांदा कोणी तयार केले, ते बाजारात कसे आले हे माहितीये का तुम्हाला?

टी-शर्टचा जन्म साधारण १९ व्या शतकात झाला. आता आपण वापरात असलेले टी-शर्ट आधी अंतर्वस्त्र म्हणून वापरले जायचे. कपडय़ाच्या आतून वनपीस म्हणजे खालचे आणि वरचे असे एकत्र असलेले हे अंतर्वस्त्र नंतर कापले गेले आणि तेव्हापासून टी-शर्ट हा वेगळा प्रकार म्हणून अस्तित्वात आला. बटण नसलेला, स्ट्रेचेबल, आणि पॅण्टमध्ये खोचला जाणारा असा हा टी-शर्ट. सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील नौदलात काम करणारे कामगार टी-शर्ट त्यांच्या युनिफॉर्मच्या आतून घालायचे. अनेकदा गरमीच्या ठिकाणी काम करताना हे कामगार त्यांचा युनिफॉर्म काढून फक्त टी-शर्ट घालून काम करीत असेत. दुसऱ्या महायुद्धानंतर, काही मोठय़ा लोकांनी  रोज कॅज्युअल कपडे म्हणून टी-शर्ट घालण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे टी-शर्ट ट्रेण्डमध्ये आले.

या टी-शर्टचे नंतर बाजारात अनेक प्रकार आले. यातल्याच ट्रेण्डी प्रकारांबद्दल.

क्रू नेक टी-शर्ट

या प्रकारातल्या टी-शर्टला राउंड नेक किंवा गोलाकार टी-शर्ट असेही म्हणतात. हा सगळ्यात कॉमन आणि जास्त वापरला जाणारा टी-शर्टचा प्रकार आहे. पण या नेकलाइनचा टी-शर्ट शक्यतो लांब किंवा अरुंद चेहरा असलेल्यांनी आणि थोडे उतरते खांदे असलेल्या मुलांनी घालावा. कारण हा टी-शर्ट तुमचा चेहरा आणि खांदे यामधला समतोल साधतो आणि बॉडी हायलाइट करतो. हा टी-शर्टचा प्रकार अस्तित्वात आल्यापासून कधीही आऊट ऑफ फॅशन गेलेला नाही. पांढऱ्या रंगाचा क्रू नेक टी-शर्ट तर तुमच्या वार्डरोबमध्ये असावाच. कारण तो टी-शर्ट कोणत्याही बॉटम्सवर आपण घालू शकतो. पांढरा क्रूनेक टी-शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स हे कॉम्बिनेशन कधीही फसत नाही. त्यामुळे हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून बघा. पांढऱ्या रंगासोबतच हे टी-शर्ट अनेक रंगांमध्ये लोकल ते ग्लोबल अशा सगळ्याच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

स्कूप नेक टी-शर्ट

हा टी-शर्ट प्रकार म्हणजे क्रू नेक टी-शर्टचाच एक प्रकार आहे. याला यू स्कूप नेक टी-शर्ट असेही म्हणतात. पण हा प्रकार फारसा लोकप्रिय नाही आणि फार वापरलाही जात नाही. याचे कारण असे की हे टी-शर्ट कशावर घालावेत हे लक्षात येत नाही. या टी-शर्टसारखी नेकलाइन मुलींच्या आऊटफिटप्रमाणे वाटते म्हणूनही मुले हा प्रकार वापरणे टाळतात. हा टी-शर्ट मोठी छाती असणाऱ्या मुलांना जास्त छान दिसतो. हा टी-शर्ट फिटिंगचा न वापरता थोडा लुज घातला तरी शोभून दिसेल. याखाली तुम्ही जीन्स, जिममध्ये वापरण्यासाठी ट्रॅक पॅण्ट, सेमी फॉर्मल पॅण्ट असं काहीही घालू शकता. तुम्ही या टी-शर्टचा वापर इनर ड्रेस म्हणूनही करू शकता. जीन्स, टी-शर्ट आणि त्यावर जॅकेटप्रमाणे शर्ट घालून बघा.

व्ही नेक टी-शर्ट

कॅज्युअल आणि फॉर्मल असे दोन्ही लुक देणारा हा टी-शर्टचा प्रकारही कॉमन आहे आणि जास्त वापरला जाणाराही आहे. ज्यांना त्यांची बॉडी, बाइसेप्स हायलाइट करायचे आहेत त्यांनी हा टी-शर्ट हमखास घालावा. गोल चेहरा आणि अप्पर बॉडी जाड असलेल्यांनीही हा टी-शर्ट घालावा. कारण यामुळे तुमची मान हायलाइट होते आणि त्यामुळे बॉडी आणि चेहरा यांचे संतुलन होण्यासाठी मदत होते. तसंच तुम्ही उंच आहात असेही भासते, त्यामुळे आपोआपच अप्पर बॉडी बारीक दिसते. हा टी-शर्ट तुम्ही इनर ड्रेस म्हणून घालून त्यावर डेनिम जॅकेट्स, ओपन शर्ट, सेमी फॉर्मल ब्लेझर असे काहीही घालू शकता. कॅज्युअल आणि फॉर्मल असे दोन्ही लुक या टी-शर्टमुळे मिळतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर ऑफिस, कॉलेज, पार्टी अशा कोणत्याही ठिकाणी करू शकता. निळ्या रंगाची जीन्स, त्यावर पांढऱ्या रंगाचा व्ही नेक टी-शर्ट आणि त्यावर तपकिरी रंगाचा सेमी फॉर्मल ब्लेझर; झाला तुमचा ट्रेण्डिग पार्टी लुक तयार!

पोलो नेक टी-शर्ट

सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार म्हणजे पोलो नेक टी-शर्ट. याला अनेक जण शर्ट कॉलर टी-शर्ट किंवा कॉलर टी-शर्ट म्हणूनही ओळखतात. तर खेळांच्या जगामध्ये याला गोल्फ टी-शर्ट आणि टेनिस टी-शर्ट म्हणूनही ओळखलं जातं. या टी-शर्टच्या कॉलरखाली एक बटणपट्टी असते. यावर दोन किंवा तीन बटणं असतात. बारीक व्यक्तींनी हा टी-शर्ट वापरावा. कारण या टी-शर्टमुळे मुलांची अप्पर बॉडी हेवी असल्यासारखी भासते. फॉर्मल  इव्हेंटसाठी, बाहेर फिरायला जाताना, ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये तुम्ही हे टी-शर्ट सहज वापरू शकता.

हेनली टी-शर्ट

हा प्रकार सर्वाधिक वाय नेक म्हणून ओळखला जातो. पण याचे मूळ नाव हेंली किंवा हेनली असे आहे. हा टी-शर्ट पोलो नेकलाइनसारखाच असतो. पोलो नेकप्रमाणेच दिसणारा, कॉलर नसणारा आणि बटणपट्टी असलेला टी-शर्ट आहे. याला वाय नेक म्हणून ओळखले जाण्यामागचे कारण म्हणजे या बटणपट्टीची बटणे उघडली की या नेकलाइनचा आकार इंग्रजी अक्षर वायप्रमाणे दिसतो. मोठी छाती, फिट अप्पर बॉडी असलेल्या मुलांना जास्त छान दिसतात. फुल, हाफ आणि थ्री-फोर्थ स्लिव्ह्जमध्येही हे टी-शर्ट्स बाजारात आहेत. हा टी-शर्ट डेनिम जीन्स, चीनोज, खाकी पॅण्ट, कार्गो पॅण्ट, स्वेटपॅन्ट अशा बॉटम्सवर घालू शकता. या प्रकारचे टी-शर्ट अनेक पॅटर्न आणि डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

हुड टी-शर्ट

या प्रकारातले टी-शर्ट फॅशन, ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. हे टी-शर्ट बाजारात आलेत तेव्हापासून ते कधीही आऊट ऑफ ट्रेण्ड किंवा ऑफ फॅशन गेलेले नाहीत. हे टी-शर्ट्स स्टायलिश इनफॉर्मल आहेत. पार्टी, इनफॉर्मल कार्यक्रम, जिम, बाहेर फिरायला जाताना, कॉलेजला जाताना घालू शकता. हे टी-शर्ट्स फुल, हाफ आणि थ्री-फोर्थ स्लिव्ह्ज आणि अगदी स्लिव्ह्जलेसमध्येही उपलब्ध आहेत. या प्रकारचे टी-शर्ट जाड-बारीक अशा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला शोभून दिसतात. त्या खाली जीन्स, ट्रॅक पॅण्ट, कार्गो पॅण्ट, शॉर्ट्स, थ्रीफोर्थ घालू शकता. अनेक िपट्र्स, रंग, पॅटर्न आणि डिझाइनसह हे टी-शर्ट लोकल ते ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

ग्राफिक टी-शर्ट

प्रत्येक मुलाच्या वार्डरोबमध्ये एक तरी ग्राफिक टी-शर्ट असतोच. हे टी-शर्ट म्हणजे सुंदर फॉण्ट, स्लोगन, ठळक िपट्र, चित्र, फोटो असा सगळ्याचा मेळ असलेला प्रकार आहे. टी-शर्टच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला ग्राफिक्स डिझाइन केलं जातं. अतिशय आकर्षक दिसणारे हे टी-शर्ट्स तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बॉटम्सवर घालू शकता. अनेक वेबसाइट किंवा दुकानांमध्ये तुम्हाला हे टी-शर्ट्स कस्टमाइझही करून दिले जातात.
सौजन्य – लोकप्रभा