वजन कमी करण्यासाठी अनेक जण आहारावर नियंत्रण आणतात. काहीजण स्वत:च हा आहार ठरवतात तर काही तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात योग्य ते बदल करतात. मात्र आहाराच्या बाबतीत काही चुका न टाळल्यास वजनावर नियंत्रण मिळवणे अवघड होते. मग आपण डाएट प्लॅनच सोडून देतो. मात्र असे करण्यापेक्षा वारंवार होणाऱ्या चुका टाळल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. याशिवाय शरीरातील अनावश्यक चरबी घटविण्यासाठी व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे असते.

१. एकसारखेच अन्न खात राहणे –

अनेकजण डाएट घेत असताना एकाच प्रकारचा अन्नपदार्थ वारंवार खातात. मात्र एकाच प्रकारचे अन्न खाऊन कंटाळा यायला लागतो आणि डाएट मधेच सोडून दिले जाते. तुमच्या डाएटमध्ये भाज्या आणि फळांचा समावेश असावा. यामुळे तुमच्या कॅलरीचा मेळ योग्य पद्धतीने राखला जातो.

२. फॉर्म्युला ड्रींकचा वापर करा –

डाएट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सप्लिमेंट्सपेक्षा संतुलित आहार घ्या, ज्यामुळे शरीराला पोषणमूल्ये मिळतील. प्रोटीन शेकसारखे फार्म्युला ड्रींक किंवा कोणत्या गोळ्यांमधून ही पोषणमूल्ये शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आणि चरबी घटवण्यासाठी सर्वांगीण आहाराची आवश्यकता असते.

३. केवळ व्यायामाने चरबी कमी होत नाही –

अनेक जण वजन घटवण्यासाठी केवळ व्यायामावर अवलंबून राहतात आणि जास्त व्यायाम केल्यास आपल्या कॅलरीज बर्न होतील असा त्यांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा असून व्यायामाबरोबरच योग्य पद्धतीचा आहार आवश्यक असतो. व्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतोच मात्र आहाराची वजन कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते.