जगात क्षय हा संसर्गजन्य रोगातील सर्वात मारक रोग ठरत असून त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. संयुक्त राष्ट्रात पुढील महिन्यात जागतिक नेत्यांची एक बैठक होत असून त्यात २०३० पर्यंत क्षयाचे निर्मूलन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे त्यासाठी वर्षांला १३ अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा बैठकीच्या पाश्र्वभूमीवर क्षयावरची उच्चस्तरीय बैठक होत असून त्यावर अमेरिका व दक्षिण आफ्रिका यांच्यातील वादंगाचे सावट आहे.

सध्या जागतिक पातळीवर एचआयव्ही व एड्स यावर लक्ष केंद्रित केले असले तरी क्षयाकडे दुर्लक्ष होता कामा नये असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दानशूर उद्योगपती तंत्रज्ञ व उद्योगपती बिल गेट्स यांनी क्षय निर्मूलनासाठी मोठय़ा प्रमाणात गरीब देशांना निधी दिला असून २६ सप्टेंबरला होणाऱ्या क्षयावरील शिखर बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.

क्षय हा अजून संपलेला नाही. जर जग एकत्र आले तर तो हटवता येईल असा विश्वास बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे. यातील अंतिम जाहीरनाम्याच्या मसुद्यावर दोन महिने चर्चा झाली त्यात दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेच्या प्रस्तावांना विरोध करून त्याची भाषा बदलण्याची मागणी केली होती. २०१६ मध्ये क्षयाने १७ लाख लोक मरण पावले होते असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.