भारतात क्षयरोगाचा प्रसार झपाटय़ाने होत असून या आजाराच्या रुग्णांच्या संख्येबाबतच्या अंदाजापेक्षाही ही संख्या तीन पटींनी अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

खासगी क्षेत्राकडून असंख्य क्षयरुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी क्षयरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात उपचार मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. २०१४मधील आकडेवारीचा विचार करता १.१९ ते ५.३४ दशलक्ष क्षयरुग्णांवर खासगी क्षेत्राकडून उपचार करण्यात आले आहेत. मात्र २.२ दशलक्ष रुग्णांची संख्या अधिक असल्याचे या संशोधकांनी मांडले आहे. लंडनमधील इम्पेरियल महाविद्यालयातील संशोधकांनी या विषयावर संशोधन केले आहे. भारत सरकारने क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम बदलल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात क्षयरुग्णांची संख्या वाढल्याचे हे संशोधन नुकतेच एका नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले. जागतिक आरोग्य क्षेत्रासमोर क्षयरोगाचे सर्वोच्च आव्हान आहे. २०१४ मध्ये जागतिक पातळीवर क्षयरुग्णांची संख्या ६.३ दशलक्ष असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र यापैकी भारतातील क्षयरुग्णांचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असल्याचे मांडण्यात आले होते. त्यामुळे भारतात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुधारितपणे मांडण्यात आला. मात्र तरीही भारतातील क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचेच स्पष्ट झाले असून क्षयरुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली आहे. मात्र भारतातील क्षयरुग्णांचा निश्चित आकडा संशोधकांनी मांडलेला नाही.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)