इंग्लंडमधील लिसेस्टर विद्यापीठात संशोधन

क्षयरोग जिवाणूच्या वाढीवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रक्रियेचा संशोधकांना नव्याने शोध लागला आहे. यात भाग घेणारे एक प्रथिन निष्क्रिय करून ही यंत्रणा बंद पाडली की, या जिवाणूचा अंत होतो. या संशोधनामुळे या जीवघेण्या रोगावर नवे रामबाण औषध तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०१६ मध्ये क्षयाने १३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती इंग्लंडमधील लिसेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी दिली. क्षयरोगाला कारणीभूत ठरणारा मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलोसिस हा जिवाणू अत्यंत चिवट आहे. तो मानवात काही दशके जिवंत राहून वाढू शकतो. या जिवाणूची पेशिभित्तिका अत्यंत जाड, गुंतागुंताची व अनेक साधारण प्रतिजैविकांना दाद न देणारी आहे. त्यामुळे या रोगाच्या अटकावासाठी नवनवी औषधे व उपाययोजना शोधाव्या लागतात.

लेसिस्टर विद्यापीठाच्या गॅलिना म्युकामोलोव्हा म्हणाल्या की, हा जिवाणू त्याच्या वैशिष्टय़पूर्ण जैविक रचनेमुळे उपचार करण्यास अत्यंत कठीण आहे. पण, आमच्या संशोधनातून त्याची कमजोरी, मर्मस्थळे उघड झाली आहेत. त्याच्यातील एक प्रथिन निष्क्रिय केले की नाटय़पूर्ण परिणाम दिसून येतात. पेशिभित्तिकेचे जैवसंश्लेषण नियंत्रित करण्याच्या त्याच्या विशिष्ट यंत्रणेत हस्तक्षेप करून त्याला कसे नष्ट करता येईल, हे आम्ही संशोधनात दाखवले आहे.

जिवाणूचा मर्मभेद

या जिवाणूच्या पेशिभित्तिका जैवसंश्लेषणात पीकेएनबी (प्रोटीन कायनेज बी)चे स्थान व त्याची वाढीसाठी गरज का असते याचा संशोधकांनी प्रथम अभ्यास केला. पीकेएनबीद्वारे सीडब्ल्यूआयएम हे दुसरे एक महत्त्वाचे प्रथिन बनवले जाते, जे या जिवाणूच्या वाढीसाठी अत्यावश्यक असते. आधुनिक औषधे आदी मार्गानी त्याला निष्क्रिय केल्यास हा जिवाणू नष्ट होऊ शकतो.