क्षयावरची लस ही पित्ताशयाचा कर्करोग रोखण्यास उपयुक्त असून मधुमेहावरील उपचारांसाठी त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यास अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. बॅसिलस कालमेट गुएरिन ही लस क्षयावर वापरली जाते. तिच्या प्रजातीय लशीचे प्रयोग टाइप १ मधुमेहावर करण्यात येत आहेत. येत्या पाच वर्षांत मधुमेहावर या लशीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ही लस पुन्हा दिल्याने टाइप १ मधुमेह रोखण्यास १८ ते ६० वयोगटातील रुग्णांमध्ये काही उपयोग होतो काय याचा विचार केला जात आहे.

या वयोगटातील मधुमेही रुग्णांमध्ये थोडय़ा प्रमाणात इन्शुलिनचे स्रवणे कायम राहात असते. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलचे संचालक डेनीस फॉस्टमन यांनी सांगितले की, टाइप १ मधुमेहात उंदरांवर बीसीजी लशीचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. उंदरांवरील प्रयोगातून बरीच माहिती मिळाली असून त्यात बीसीजी लस कसे काम करते यावर प्रकाश पडला आहे.

बीसीजी लस गेली नव्वद वर्षे क्षयावर वापरली जात असली तरी आता त्याचा वापर मधुमेहावर केला जाणार आहे. या लशीमुळे पित्ताशयाचा कर्करोगही रोखण्यास मदत होते. या लशीमुळे टय़ुमर नेक्रॉसिस फॅक्टर नियंत्रित केला जातो त्यामुळे सदोष पांढऱ्या रक्तपेशी रोखल्या जाऊन टाइप १ मधुमेहावर फायदा होतो.  यात नवीन प्रकारच्या संरक्षक टी पेशी तयार होऊन मधुमेहाला कारण ठरणाऱ्या टी पेशी मात्र नष्ट होतात. यात चार आठवडय़ांत रुग्णांना बीसीजीची दोन इंजेक्शन देण्यात आली असता त्यांचा चांगला परिणाम दिसला पण यात दरवर्षी एक याप्रमाणे चार वर्षे इंजेक्शन घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.