18 February 2019

News Flash

आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवारी दुपारी विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास बुधवारी दुपारी विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सपत्निक घटस्थापना करण्यात आली. यावेळी आई राजा उदो-उदोच्या जयघोषाने तुळजाईनगरी दुमदुमून गेली. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजापुरात कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भक्तीचा जागर चालणार असून मंदिर संस्थानसह प्रशासनातील सर्व यंत्रणा भक्तांच्या सोयी-सुविधासाठी सज्ज झाल्या आहेत.

बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी देवीचे महंत तुकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर आदींसह पुजारी, भक्तगण उपस्थित होते. सकाळी घटस्थापना विधीस मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार राहुल पाटील, योगिता कोल्हे, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, अमरराजे परमेश्वर, अनंत कोंडो, बाळकृष्ण कदम, नगरसेवक अविनाश गंगणे, प्रा. काकासाहेब शिंदे, जयंत कांबळे, किशोर कुलकर्णी, शशिकांत पाटील, बुबासाहेब पाटील, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, प्रा. संभाजी भोसले यांच्यासह पुजारी, भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली.

त्यानंतर मंदिरातील उपदेवतांच्या ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी मंदिर संस्थानने जय्यत तयारी केली असून पहिल्या दिवसापासूनच भक्तांच्या गर्दीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. भक्तांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स तसेच सूचना फलक लावण्यात आलेले असून ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्राचीही सोय करण्यात आली आहे.

First Published on October 10, 2018 6:26 pm

Web Title: tuljabhavani temple ghat sthapana