देशातील प्रमुख दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या TVS Motors ने भारतीय बाजारात आपली ‘बेस्ट सेलिंग स्कूटर’ TVS Jupiter नवीन अपडेटेड BS6 इंजिनसह काही महिन्यांपूर्वीच लाँच केली. BS6 इंजिनमध्ये लाँच झाल्यापासून दोन महिन्यांमध्येच कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. यापूर्वी जूनमध्येही कंपनीने या स्कूटरची किंमत वाढवली होती.

TVS ची लोकप्रिय स्कूटर Jupiter आता महाग झाली आहे. कंपनीने BS6 TVS Jupiter स्कूटरच्या किंमतीत 1,040 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता Jupiter च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 63,102 रुपये झाली आहे. तर, TVS Jupiter ZX व्हेरिअंटची किंमत 65,102 रुपये आणि टॉप व्हेरिअंट Classic ची किंमत 69,602 रुपये झाली आहे. वरील सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.

यापूर्वी जून महिन्यात कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत 651 रुपयांची वाढ केली होती. बीएस-6 अपडेट इंजिन आणि करोना महामारीचं संकट यामुळे किंमतीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंमतीतील बदलाशिवाय स्कूटरमध्ये अजून काही बदल झालेला नाही. या स्कूटरमध्ये 110cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7000 rpm वर 7.3hp ची पॉवर आणि 5500 rpm वर 8.4Nm टॉर्क निर्माण करतं. CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या इंजिनमध्ये टीव्हीएसचं ET-Fi (इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन) सिस्टिम आहे. आधीपेक्षा नवीन Jupiter चा माइलेज 15 टक्के अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे.

फीचर्स :-
TVS Jupiter स्कूटरमध्ये LED हेडलॅम्प, LED टेललॅम्प आणि ट्युबलेस टायर आहेत. दोन्ही बाजूंना 130mm ड्रम ब्रेक दिले आहेत. तर, स्कूटरच्या सीटखाली 21-लिटर इतकं स्टोरेज स्पेस आहे. क्लासिक व्हेरिअंटमध्ये USB चार्जर, बॅक रेस्ट आणि एक्स्टर्नल फ्युअल फिलिंग यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय कंपनीने नुकतीच आपली Scooty Zest 110 देखील बीएस6 मॉडेलमध्ये लाँच केली आहे. BS6 TVS Zest 110 ची एक्स-शोरुम किंमत 58,460 रुपये आहे.