TVS ने आपली लोकप्रिय स्कूटर Ntorq 125 ची विशेष आवृत्ती लाँच केली आहे. TVS Ntorq 125 Race Edition नावाने दाखल झालेल्या या नव्या मॉडलची एक्स-शोरुम किंमत 62 हजार 995 रुपये आहे. एनटॉर्क 125 स्कूटरच्या स्टँडर्ड मॉडलपेक्षा तीन हजार रुपये याची अधिक किंमत आहे. नव्या स्कूटरमध्ये T आकाराच्या एलईडी डीआरएलसह नवीन एलईडी हेडलाइट आहे. याशिवाय अन्य काही बदल देखील करण्यात आले आहेत.

नव्या एलईडी हेडलाइटशिवाय स्कूटरच्या रेस एडिशनमध्ये नवीन कलर स्कीमचा वापर करण्यात आला आहे. बॉडी पॅनल रेड, ब्लॅक आणि सिल्वर रंगांमध्ये आहे. रेस एडिशनचा विशेष बॅज या स्कूटरसोबत आहे. एकूण आठ विविध रंगांचे पर्याय या स्कूटरसाठी देण्यात आले आहेत. यातील तीन मेटेलिक आणि 5 मॅट फिनिश आहेत. स्कूटरमध्ये मॅकेनिकली काहीही बदल करण्यात आलेला नाही. एनटॉर्कमध्ये 124.8cc, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आलं असून हे इंजिन 7,500rpm वर 9.4hp ची ऊर्जा आणि 5,500rpm वर 10.5Nm टॉर्क निर्माण करतं. ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी फीचर असल्याने स्मार्टफोनशी ही स्कूटर कनेक्ट करता येते.

एनटॉर्क 125 ही स्कूटर कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. लाँचिंगच्या सात महिन्यांहून कमी वेळेत या स्कूटरच्या एक लाख युनिटची विक्री झाली होती. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या स्कूटरसाठी ड्रम ब्रेक व्हेरिअंट लाँच केलं होतं.