ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या ‘कारबेरी’ मोटारसायकलने १ हजार सीसी वी ट्विन इंजिनची रॉयल एनफिल्ड ही बाईक तयार केली आहे. कंपनीतर्फे बनविण्यात आलेली ही पहिली बाईक आहे ज्यामध्ये भारतात तयार करण्यात आलेले इंजिन लावण्यात आले आहे. यामध्ये दोन ५०० सीसीचे इंजिन एकत्र करुन १००० सीसीचे ट्विन इंजिन बनविण्यात आले आहे.

आता रॉयल एनफिल्ड म्हटल्यावर त्याची किंमतही तशीच असणार. या गाडीची किंमत आहे तब्बल ४ लाख ९६ हजार रुपये. ५० टक्के रक्कम भरुन ग्राहकांना गाडीचे बुकिंग करता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हे इंजिन कस्टमाईज्ड आहे. हे इंजिन अतिशय कार्यक्षम आहे. सध्या ही गाडी केवळ निर्यात होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ती केवळ पाहण्यासाठी शोरुममध्ये उपलब्ध आहे. मात्र ज्या भारतीयांना ही गाडी खरेदी करायची आहे त्यांना वर्षाअखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

यामध्ये ७ प्लेटचा प्लच आणि अतिशय मजबूत अशी चेन देण्यात आली आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे गाडीची पॉवर अतिशय चांगली झाल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. कारबेरीने या बाईकमध्ये जास्त पॉवरची मोटार बसविली आहे. या बाईकची ऑईल क्षमता ३.७ लीटर इतकी आहे. विशेष म्हणजे लिफ्टर्स आणि ऑईल पंपाची निर्मिती स्वतः कंपनीने केली आहे. १००० सीसीच्या इंजिनमुळे गाडी अतिशय वेगवान बनली आहे.