स्वमग्नता विकाराची लक्षणे जुळ्या असलेल्या मुलांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेने दिसून येतात, असे दिसून आले आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (स्वमग्नता) हा विकार जुळ्या मुलांमध्ये असला, तर त्यात फरक असतो. बिहॅवियर जेनेटिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधात म्हटले आहे, की जुळ्या मुलांमध्ये स्वमग्नतेची लक्षणे सारख्याच तीव्रतेची आहेत असे समजून जर उपचार केले, तर त्यामुळे चुका होऊ शकतात.

वॉशिंग्टन विद्यापीठातील जॉन काँस्टँटिनो यांनी सांगितले, स्वमग्नता हा मानवी शरीरातील विकासात्मक प्रक्रियेतील त्रुटींचा आजार आहे. त्यात माणसाच्या इतरांशी वागण्यात व प्रतिसादात बदल होतो व ती व्यक्ती सहज ज्ञान आत्मसात करू शकत नाही. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार स्वमग्नता असलेल्या जुळ्यांमध्ये विकाराची लक्षणे सारखीच असतात असे मानले जात होते. पण नवीन अभ्यासानुसार ३६६ जुळ्या मुलांची तपासणी करण्यात आली असता त्यात असे दिसून आले, की स्वमग्नतेची त्यांच्यातील लक्षणे वेगवेगळ्या तीव्रतेची असतात.

या संशोधनात वैद्यकीय तपासण्या व प्रश्नावली अशा दोन्ही पद्धतीने जुळ्या मुलांची माहिती घेण्यात आली. त्यात त्यांच्या लक्षणांची तीव्रता वेगवेगळी दिसून आली. या रोगात जनुकीय घटक हे ९ टक्के कारणीभूत असल्याचे दिसून आले. ज्या जुळ्या मुलांना स्वमग्नतेचा विकार नव्हता त्यांच्यात लक्षणे दिसून आली नाहीत. जुळ्या मुलांना जर स्वमग्नता असेल, तर त्यांच्या लक्षणांची तीव्रता वेगळी का असते याची कारणे मात्र उलगडता आलेली नाहीत. त्यामुळे त्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे सांगण्यात आले.