फेसबुक आणि ट्विटर ह्या सोशल मीडियातील दोन दिग्गज कंपन्या. दोन्ही कंपन्यांच्या सीईओंची एकाच मुद्द्यावरील भूमिका नेहमीच दोन टोकाची असल्याचं आपण पाहिलंय. आता हे दोन्ही सीईओ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याला कारणही तसंच आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना अनफॉलो केलं आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं. ज्या पद्धतीने डॉर्सी यांनी झुकेरबर्ग यांना अनफॉलो केलं त्यामुळे जगभरातील सोशल मीडिया युजर्सचं लक्ष त्यांनी वेधलंय.

आणखी वाचा – Twitter च्या सीईओंनी ‘या’ तीन शब्दांमध्ये उडवली Facebook च्या नव्या ‘लोगो’ची खिल्ली

झुकेरबर्ग यांना अनफॉलो करण्याआधी डॉर्सी यांनी @bigtechalert नावाच्या एका ट्विटर अकाउंटला फॉलो केलं. हे ट्विटर अकाउंट टेक कंपन्यांचे सीईओ कोणाला फॉलो किंवा अनफॉलो करतात यावर नजर ठेवून असतं. परिणामी झुकेरबर्ग यांना अनफॉलो केल्याचं जगाला कळावं अशीच डॉर्सी यांची इच्छा होती असं मानलं जातंय.

डॉर्सी यांनी @bigtechalert ला फॉलो केल्यानंतर त्या अकाउंटने ट्विट करुन, @jack (डॉर्सी यांचं टि्वटर हँडल) आता @BigTechAlert ला फॉलो करत असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर लगेचच @BigTechAlert ने ट्विट करुन “@jack आता @finkd (मार्क झुकेरबर्ग यांचं टि्वटर हँडल) यांना फॉलो करत नाहीत” असं ट्विट केलं. इतकंच नाही तर, ट्विटरचे अधिकृत पीआर अकाउंट @twittercomms नेही यावर तातडीने प्रतिक्रिया दिली. यामध्ये, “झुकेरबर्ग यांनी 2012 पासून झुकेरबर्ग यांनी @finkd या अकाउंटद्वारे काहीच ट्विट केलेलं नाहीये आणि त्यांच्या अकाउंटमध्ये एकूण केवळ 12 ट्विट आहेत”, असं म्हटलंय. खरं तर झुकेरबर्ग आपल्या सोशल मीडियाचा (टि्वटरचा) वापरच करत नसल्याचा राग बहुदा डॉर्सी यांना आला असावा. कारण झुकेरबर्ग यांनी टि्वटर अकाऊंट सुरू केले खरे, पण त्यावरून त्यांनी केवळ १२ टि्वट केले आहेत. त्यातही शेवटचं टि्वट हे सात वर्षांपूर्वी केलेलं आहे. या दोन्ही सीईओंची आपल्या प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य , फेक न्यूज किंवा राजकीय जाहिराती यांसारख्या मुद्द्यांवर वेगवेगळी मतं आहेत. डॉर्सी यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींवर बंदी घातली, तर झुकेरबर्ग यांनी मात्र असं कोणतंही पाऊल उचललेलं नाही.