जम्मू-काश्मीरचा प्रदेश हा भारतीय नकाशाऐवजी चीनच्या नकाशात दाखवल्याने निर्माण झालेल्या वादासंदर्भात ट्विटरने स्पष्टीकरण दिलं आहे. रविवारी ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ (ओआरएफ) या थिंक टँकच्या एका सदस्याने ट्विटरवर जम्मू-काश्मीर पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग असल्याचे दाखवत आहे असा स्क्रीनशॉर्ट शेअर केला होता. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली होती. मात्र सोमवारी ट्विटरने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ही एक तांत्रिक चूक होती असं म्हटलं आहे. तसेच ही चूक सुधारण्यात आल्याचंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य आपल्याला असून याबद्दल अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे, असं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

ट्विटरने जारी केलेल्या अधिकृत पत्रकामध्ये कंपनीच्या प्रवक्त्यांनी, “आम्हाला रविवारी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीसंदर्भात समजले. या विषयासंदर्भातील गांभीर्य आम्हाला आहे. यासंदर्भात आमच्या टीमने चौकशी सुरु केली असून जीओटॅगिंगची चूक सुधारण्यात आली आहे,” असं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

ओआरएफचे सदस्य असणाऱ्या कांचन गुप्ता यांनी या प्रकरणाबद्दल रविवारी एक ट्विट केलं होतं.  ट्विटरवरील एका लाइव्ह व्हिडीओच्या नोटीफिकेशनचा स्क्रीनशॉर्ट गुप्ता यांनी शेअर करत त्यामध्ये जम्मू-काश्मीर हा पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग असल्याचे दिसत आहे याकडे लक्ष वेधलं होतं. “तर ट्विटरने भूगोल बदलून जम्मू-काश्मीरला पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग घोषित केलं आहे. याला भारतीय कायद्याचे उल्लंघन नाही तर काय म्हणायचे? यासाठी भारतीयांना अनेकदा शिक्षा झाली आहे. मात्र अमेरिकेतील मोठ्या कंपन्या आपल्या कायद्याहून मोठ्या आहेत का?,” असं ट्विट गुप्ता यांनी केलं होतं. यामध्ये त्यांनी भारताचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनाही टॅग केलं होतं.

त्यानंतर अन्य एका ट्विटमध्ये लेह सुद्धा चीनचा भाग असल्याचे ट्विटरकडून दाखवण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिलेलं.

गुप्ता यांचे हे ट्विट व्हायरल झालं. हजारो लोकांनी ते रिट्विट केलं. अनेकांनी केंद्र सरकारने यासंदर्भात कठोर निर्णय घेत दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

“ट्विटर आणि ट्विटर इंडिया तुमच्या म्हणण्यानुसार लेह चीनचा भाग आहे,” असं एका नेटकऱ्याने स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत विचारलं होतं. “या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करा. सोशल मिडिया कंपन्यांना त्यांच्या मुर्खपणासाठी आता आपण जबाबदार धरण्यास आणि त्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहता कामा नये,” असं अन्य एकाने म्हटलेलं. “यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन ट्विटर इंडियाविरोधात कारवाई करा. भारताच्या एकात्मतेला ते अशाप्रकारे गृहित धरु शत नाही. अशाप्रकारेचं वागणं सवयीचा भाग होण्याआधी त्यावर कारवाई करा,” असं दुसऱ्या एका व्यक्तीने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. गजर पडल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक करावी असे मतही अनेकांनी व्यक्त केलं होतं. मात्र आता ट्विटरने माफी मागितल्यानंतर यासंदर्भात सरकार काही पावलं उचलतं का याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिलं आहे.