‘ट्विटर अ‍ॅपमध्ये मॅलिशिअस कोड इंजेक्ट करण्यात आले होते, त्याद्वारे युजर्सची वैयक्तीक माहिती मिळवता येणेही शक्य होते. गेल्या शुक्रवारी याचा परिणाम भारतासह जगभरातील ट्विटर युजर्सच्या अकाउंटवर दिसून आला होता’, हे मान्य करत ट्विटरने आपल्या युजर्सना तातडीने अँड्रॉइड अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना केली आहे.

ट्विटरकडून युजर्सना मेल पाठवून अँड्रॉइड अ‍ॅप तात्काळ अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे. अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यात आली आहे. तसंच युजर्सना इमेलद्वारे नोटिफिकेशन्स देऊन त्यांना अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती ट्विटरने दिली. मात्र, याचा किती युजर्सना फटका बसलाय, याची माहिती दिलेली नाही. याशिवाय iOS वेब युजर्सना याचा फटका बसलेला नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

डेटा चोरीचे काही पुरावे मिळालेत की नाही याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी केवळ सिक्युरिटी पॅच जारी करण्यात आले असून युजर्सना ईमेलकरुन अँड्रॉइड अ‍ॅप अपडेट करण्याची सूचना करण्यात आली आहे.