फेसबुक आपल्या आयुष्याचा जणू एक भागच बनला आहे. काहिंची दिवसाची सुरुवात फेसबुकच्या दर्शनाने होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सोशल मीडिया फ्रेंडली एखादा व्यक्ती दिवसातून किमान दहावेळा तरी फेसबुकवर लॉगिन करतो. तर कित्येक जण असे असतात की ते दिवसातून जे जे काही करतील त्याच्या सगळ्या अपडेट्स फेसबुकवर टाकत असतात. नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. यानुसार जर एखाद्याच्या पोस्टवर दिवसांतून त्या युजर्सच्या जवळच्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर त्यांच्या दैंनदिन जीवनात याचा खूप मोठा फरक पडू शकतो. जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीच्या दिवसातील दोन कमेंट देखील फेसबुक युजर्सच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो.
हा फंडा गरोदर महिला आणि लग्न होणा-यांना जास्त लागू होऊ शकतो असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे. कारनेगी मेलान यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात हे समोर आले आहे. कंप्युटर मेडिटेड कम्युनिकेशनकडून या संशोधनासंबधिताच प्रबंध प्रकाशित करण्यात आला. जगभरातल्या ९१ देशातील जवळपास दोन हजार युजर्सना घेऊन काही संशोधन करण्यात आले आणि त्यांच्यावर जवळपास ३ महिने अभ्यास करण्यात आला त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. गरोदर महिला किंवा नवीन लग्न ठरलेल्यांनी जर फेसबुकवर काही पोस्ट टाकली आणि त्यावर आवडत्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर साहजिक त्यांच्या चेह-यावर हसू येते. आपली आवडती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते किंवा आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे अशा युजर्सच्या मानसिकतेत हळूहळू सकारात्मक बदल होतात. हे बदल आपसूकच त्यांची चिडचिड, एकटेपणा, ताण दूर करतात. जर अशा जवळच्या व्यक्तींकडून दिवसांतून दोन कमेंट म्हणजे महिन्याला ६० कमेंट आल्या तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडलील असा निष्कर्ष यातून काढला आहे. पण याच बरोबर पोस्ट लाईक केल्याने मात्र फारसा काही फरक पडत नाही असेही यात सांगितले आहे.