आयटी क्षेत्र हे काही वर्षांपूर्वी नोकऱ्या देणारे मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जात होते. भारतात आयटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. मात्र मधल्या काळात या क्षेत्रात मोठी पोकळी तयार झाली आणि आयटीमध्ये नोकऱ्या मिळणे आवघड झाले. परंतु आता पुन्हा ही पोकळी भरुन निघण्याची चिन्हे असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमडीआय, एसपीजेआयएमआर आणि आयआयएफटी या प्लेसमेंट कंपन्यांद्वारा यंदा नोकऱ्यांच्या जास्त संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

यंदा आयटीच्या जवळपास २ लाख जागा उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांना ११९ कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असल्याचे एका प्लेसमेंट कंपनीने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. नोकरीमध्ये चांगले पॅकेज मिळणे ही नोकरदाराची मुख्य गरज असते. यंदा अनेक उमेदवारांना त्यांच्या नोकरीमध्ये चांगले पॅकेज मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये देशातील कंपन्यांबरोबरच परदेशी कंपन्यांसाठीही अनेक तरुणांची निवड केली जात असून परदेशात जाणाऱ्या आयटी क्षेत्रातील तरुणांची संख्या वाढणार आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूव्दारे तसेच प्लेसमेंट कंपन्यांव्दारे तरुणांना या संधी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.