देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या कालावधीत दूरसंचार कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात देशात संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. याचाच मोठा फटका या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते.

अहवालानुसार या कालावधीत सर्वाधिक फटका हा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांना बसला. या कालावधीत जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘संपूर्ण उद्योगविश्वाच्या दृष्टीनं मार्च आणि एप्रिल महिन्यात अनुक्रमे २८ लाख आणि ८२ लाख ग्राहकांची मासिक घट पाहायला मिळाली. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये मोठी घट होणं हे या मोठ्या आकड्यांमागील कारण आहे. तर या कालावधीत रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं,’ असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

“मार्च अखेरिसपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाउन एप्रिलच्या संपूर्ण महिन्यातही लागू होता. यामुळेच ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यापुढील कालावधीतही दूरसंचार कंपन्यांवर प्रभाव दिसून येईल,” असं संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.