कॅब सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी Uber ने भारतात नवीन ऑटो रेंटल सर्व्हिसची सुरूवात केली आहे. या सेवेद्वारे कंपनी आता कॅबसोबतच ऑटो रिक्षाही रेंटवर उपलब्ध करणार आहे. म्हणजेच तुम्ही आता उबरच्या माध्यमातून रिक्षाही बूक करु शकतात. या नव्या सेवेसाठी कंपनीकडून प्रतितास 149 रुपये आकारले जातील. याशिवाय या पॅकेजमध्ये फ्री किलोमीटरचाही समावेश आहे. ही सेवा पुण्यात सुरू झाली आहे. याशिवाय, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआर अशा भारतातील इतर पाच शहरांमध्येही ही सेवा उपलब्ध आहे.

वारंवार ऑटो बदलावी लागणार नाही :-
या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनवर जाण्यासाठी वारंवार कॅब/ऑटो बदलावी किंवा बूक करावी लागत नाही. जर तुम्ही एका तासासाठी रिक्षा बूक केली असेल तर यासाठी तुम्हाला केवळ 149 रुपये द्यावे लागतील आणि या कालावधीत तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणचा प्रवास करु शकतात. ग्राहक जास्तीतजास्त 8 तासांसाठी रिक्षा बूक करु शकतात.

अन्य शहरांमध्येही लवकरच सुरू होणार सर्व्हिस :-
या सेवेमुळे ऑटो रेंटल सेवा 24×7 उपलब्ध करणारी UBER देशातील पहिली राइड शेअरिंग कंपनी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. याद्वारे ग्राहक आपल्या गरजेनुसार ठराविक तासांसाठी रिक्षाचं बुकिंग करु शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या फोनमधील कंपनीचं अ‍ॅप अपडेट करावं लागेल. सध्या कंपनीने ही सेवा देशातील सहा मोठ्या शहरांमध्ये सुरू केली आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांच्या आधारे कंपनी ही सेवा देशातील अन्य शहरांमध्येही लवकरच सुरू करणार आहे.