‘उबर’, ‘ओला’ ही नावं काही आपल्याला नवीन नाहीत. टॅक्सीचा घोळ असला तर या दोन टॅक्सी सर्व्हिसेसकडे आपल्या सगळ्यांचा ओढा असतो. या सर्व्हिसेसमध्ये भले थोडं जास्त भाडं भरावं लागतं. पण टॅक्सीवाल्याने कुठल्या ठिकाणी जाणं टाळल्याचा प्रश्नच नसतो. आता या कंपन्यांपैकी ‘उबर’ फक्त टॅक्सी सर्व्हिसपुरत्या मर्यादित नाही राहणार आहेत.

‘उबर’ने आता ‘फूड डिलिव्हरी’ करायला सुरूवात केली आहे. त्यांनी त्यांचं ‘उबर ईट्स’ हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे ते चक्क जेवण डिलिव्हर करणार आहेत. आपण आपल्या फेव्हरेट रेस्टॉरंटमधून आपल्याला आवडती डिश ऑर्डर करायची आणि तो पदार्थ तिथून ‘उबर’ची टॅक्सी आपल्याला आपल्या मनाजोगत्या ठिकाणी आणून देणार.

या क्षेत्रामध्ये त्यांना झोमॅटो, स्विगी आणि फूडपांडा या कंपन्यांशी चांगलीच लढत द्यावी लागणार आहे. या सगळ्या कंपन्या फूड डिलिव्हरीच्या मार्केटमध्ये चांगलंच बस्तान बसवून आहेत. त्यांच्याशी उबरला चांगलीच टक्कर द्यायलाा लागणार आहे.

यासाठी उबर अनेक रेस्टॉरंट्सशी करार करणार आहे. एखाद्या रेस्टॉरंटमधला पदार्थ मागवल्यावर त्यातला २० ते ३५ टक्के किंमत उबरच्या खात्यावर जमा होणार आहे.

“उबरचं उत्कृष्ट नेटवर्क, आमची टेक्नॉलॉजी आणि आमच्या रेस्टॉरंट पार्टनर्सची उत्तम सर्व्हिस याच्या जोरावर आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तमातली उत्तम सेवा पुरवू शकू” उबर ईट्सचे भारतातले प्रमुख भाविक राठोड ‘आज तक’शी बोलताना म्हणाले.

टॅक्सी सर्व्हिसेसच्या बाबतीत ‘उबर’ ची प्रतिस्पर्धी कंपनी ‘ओला’ने ‘ओला कॅफे’ नावाने अशीच फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली होती. पण ही सर्व्हिस नंतर बंद पडली होती. ‘ओला’ ने मुंबई, दिल्ली बंगळुरू आणि हैदराबाद या शहरामध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती.