देशात हवेत उडणारी टॅक्सी या संकल्पनेला आता मूर्त रुप येणार असल्याचे नक्की झाले आहे. येत्या काही वर्षात भारतात या फ्लाईंग टॅक्सी दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरीकन कंपनी असलेल्या उबरच्या उबर एलिवेट या कंपनीने २०१३ पर्यंत जगातील ५ देशांमध्ये ही सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले असून त्यामध्ये भारताचा समावेश आहे. भारताबरोबरच जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांचीही या सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याआधी लॉस एंजेलिस आणि दलास याठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने नुकतीच नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांच्याशी याबाबत बोलणी केली.

भारतात सुरुवातीला दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घाईच्या वेळेला अगदी कमी वेळात हवेतून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे प्रवाशांना शक्य होणार आहे. ही इलेक्ट्रीक टॅक्सी प्रतितास ३०० किलोमीटर या वेगाने उडू शकेल. हजार ते दोन हजार फूटांवर उडणाऱ्या या टॅक्सीचा हॅलिकॉप्टरपेक्षा कमी आवाज होईल. अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने या प्रकल्पासाठी नासासोबत करार केला आहे. त्याअंतर्गत शहरी भागात हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर काम केल जात असल्याचे नासाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आता उडणारी टॅक्सी असल्याने याचा दरही जास्त असेल असे आपल्याला साहजिकच वाटेल. पण हा दर सामान्य टॅक्सी इतकाच ठेवण्याचा प्रयत्न कऱणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या अनोख्या सेवेसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजण्याची आवश्यकता नसेल असा अंदाज आहे. शहारांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यामुळे शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर निर्माण होणार ताण यामुळे काही प्रमाणात कमी होईल अशी आशा आहे.