आजपासून राज्यभरात प्लास्टीक बंदी लागू झाली आहे. पर्यावरण हानीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असला तरीही नागरिकांची मात्र यामुळे काहीशी गैरसोय होणार असल्याचे दिसते. मागील अनेक वर्षांपासून कित्याक वस्तू या केवळ प्लास्टीकचा वापर करुन वाहिल्या जात होत्या, त्यांना चांगला पर्याय शोधावा लागणार आहे. किराणा माल ही त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट. किराणा मालातील प्रत्येक पदार्थासाठी वेगळी पिशवी वापरली जाते. त्यामुळे याठिकाणी प्लास्टीकच्या पिशव्या मोठया प्रमाणात लागतात. अगदी लहान दुकानापासून ते मोठमोठ्या मॉलपर्यंत सर्व ठिकाणी किराणा सामान प्लास्टीकच्या पिशवीत भरुन ठेवलेले असते. याला पर्याय काय असू शकतो असे आपल्याला कोणी विचारले तर आपल्याला पटकन सुचणार नाही. मात्र युनायटेड किंग्डममधील बर्मिंगहम येथील एका स्टोअरने यावर उपाय शोधून काढला आहे. यासंदर्भातील एक व्हिडियो बीबीसीने अपलोड केला असून यामध्ये अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

हा पर्याय जरा हटके आहे. किराणा माल भरायला येताना तुम्ही तुमच्या घरातील डबे आणि बरण्या घेऊन यायचे. आल्यावर मोकळ्या असलेल्या या डब्यांचे वजन करायचे आणि त्यावर वजनाचे स्टीकर लावायचे. नंतर तुम्हाला हवा असणारा किराणा माल तुम्हाला हव्या त्या डब्यात काढून घ्यायचा. आणि मग पुन्हा वजन करुन त्याप्रमाणे पैसे भरायचे. यासाठी याठिकाणी वजनकाटे आणि किराणामाल घेण्यासाठी मोठे चमचे, डावही ठेवण्यात आले आहेत. हा पर्याय सुरुवातीला आपल्याला थोडा वेगळा वाटेल. पण बर्मिंगहम याठिकाणी तो सर्रास अमलात आणला जात असल्याने येथील लोकांना त्यात काहीच वेगळे किंवा अवघड वाटत नाही. विशेष म्हणजे त्यामुळे याठिकाणी प्लास्टीकचा अजिबात वापर होत नाही.

तसेच सध्या आपल्याकडे मॉलमध्ये कॅरीबॅगसाठी आपल्याला जास्तीचे पैसे माजोवे लागतात. मात्र या प्रकारामुळे आपल्याला ते पैसेही भरावे लागणार नाहीत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, येथील लोक घरुन न विसरता पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा पिशव्या, डबे आणि बरण्या सोबत घेऊन येतात. आपल्याकडेही या पर्यायाचा नक्कीच विचार करता येऊ शकतो. त्यामुळे प्लास्टीक बंदीमुळे सामान नेण्यात अडचण येणार नाही आणि प्लास्टीकमुळे होणारे प्रदूषणही टळेल. तेव्हा हा व्हिडियो पाहा आणि येथील नागरीक अशाप्रकारे घरुन डबे आणि बरण्या घेऊन येण्याबद्दल काय म्हणतात ते पाहा.