वंध्यत्वावर प्रभावी उपचार म्हणून वापर; जनुकांशी कुठलाही खेळ नाही
ब्रिटनमध्ये जनुक संपादनाचे तंत्र तुलेनेने पुढे गेलेले असून तेथील वैज्ञानिकांनी आता गर्भाच्याच पातळीवर सदोष जनुके काढून टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे. खरे तर यामुळे जन्माला येणारी संततीच मोठय़ा रोगांपासून मुक्त असणार आहे. शिवाय या संशोधनातून काही महिलांमध्ये गर्भधारणा का होऊ शकत नाही याचाही उलगडा होणार आहे.
चिनी वैज्ञानिकांनी अलीकडेच मानवी गर्भात जनुकांचे संपादन नको असलेली जनुके काढून टाकणे, चांगली असलेली रोगास अनुकूल जनुके काढून टाकणे हे तंत्रज्ञान वापरले होते व त्यामुळे वाद झाला होता जनुकीय संपादनच्या तंत्राला क्रिस्पआर किंवा कॅस ९ असे म्हणतात.
लंडनच्या फ्रानिस क्रीक इन्स्टिटय़ूटमधील वैज्ञानिक कॅथी नियाकन यांनी सांगितले की, ब्रिटिश सरकारने असे जनुकीय संपादन करण्यासाठी परवानगी द्यावी, असे आमच्या संस्थेने म्हटले आहे. मूलपेशी वैज्ञानिक असलेल्या कॅथी यांच्या मते मानवी पुरुत्पादनात संपादित जनुके वापरण्याचा आमचा हेतू नाही. त्यात फक्त बाह्य़पात्र फलनाच्या प्रक्रियेत (इन व्ह्रिटो फर्टलिायझेशन) संतती जन्माची शक्यता वाढावी असा आमचा हेतू आहे, थोडक्यात वंध्यत्वावर प्रभावी उपचार म्हणून आम्ही त्याचा वापर करणार आहोत
वैज्ञानिकांनी क्रिस्प आर व कॅस ९ पद्धतींवर चर्चा केली असून या पद्धतीत जनुकांचे संपादन शक्य आहे. मानवी गर्भामध्ये ते करता येते. यात सदोष जनुके दुरुस्त करता येतील किंवा काढून टाकता येतील, त्यातून मनोवांच्छित संततीसाठी त्यामुळे प्रयत्न करता येतील. अ‍ॅथलिट्स किंवा बुद्धिमान लोक त्यातून जन्माला घालता येतील.
नियाकन यांनी याबाबत संशय दूर करताना सांगितले की, आम्ही जनुकीय संपादनाचा वैद्यकीय संशोधनासाठी वापर करणार आहोत. गर्भाच्या वाढीत जनुकांची भूमिका आम्हाला तपासायची आहे. जर त्यातून काही धागेदोरे मिळाले तर वारंवार गर्भपात होणाऱ्या किंवा गर्भधारणा होऊ न शकणाऱ्या स्त्रियांना कदाचित एक दिवस मातृत्वाचे वरदान मिळेल. यात जनुकांशी कुठलाही खेळ केला जाणार नाही. फक्त कुठला जनुक काढला किंवा दुरुस्त केला की काय होते ते कळेल. ब्रिटनमध्ये जनुकांच्या सुलभीकरणाला २००८ मध्ये मान्यता दिलेली आहे. त्यात १४ दिवसांच्या गर्भावर संशोधन करता येते, पण अजून जनुक संपादनाला परवानगी दिलेली नाही.

जनुक संपादनाचे फायदे
’मनोवांच्छित संतती जन्माला घालणे.
’क्रिस्पआर किंवा कॅस ९ या दोन जनुक संपादन पद्धती.
’गर्भधारणा न होण्यामागचे कारण समजण्यासाठी संशोधन.
’रोगमुक्त संतती शक्य.