गुगल आणि सोशल नेटवर्कींग साईटसचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. मात्र हल्ली चुकीच्या गोष्टींसाठीही या माध्यमाचा वापर केला जातो. गुगल या सर्च इंजिनचा तसेच फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटसचा वापर करुन दहशतवादी कारवायांशी लढा देण्याचा क्रांतीकारी निर्णय ब्रिटनने घेतला आहे. गुगल आणि फेसबुकच्या मदतीने दहशतवादी कारवाया रोखणार असल्याचे देशाच्या सुरक्षा मंत्र्यांनी म्हटले आहे. काही हॅकर्सतर्फे सोशल मीडियाचा वापर करुन डेटा गोळा करण्याचे काम केले जाते. हा डेटा विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसेही घेतले जातात. दहशतवादी या पद्धतीचा वापर करुन एखाद्या देशाची माहीती मिळविणे आणि त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करणे असे प्रकार सध्या वाढले आहेत. मात्र अशाप्रकारच्या हॅकर्सकडे विशेष लक्ष दिले जाणार असून त्यांना रोखण्यासाठी विशेष यंत्रणा नेमण्यात येणार असल्याचे सुरक्षा मंत्री म्हणाले.

अनेकदा सार्वजनिक सुरक्षेपेक्षा खासगी फायद्याचा विचार केला जातो. लोन घेण्यासाठी किंवा टॅक्स भरताना आपण काही गोष्टी सर्च करतो. मात्र हॅकर याच गोष्टीचा फायदा घेऊन आपली माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता देशाचे सायबर सेल याबाबतीत विशेष दक्ष राहणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या शोधकार्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक कऱण्यात आली असून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. तसेच काही कंपन्यांचीही मदत घेतली जात असल्याचे यु-ट्यूबच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.