बेंगळुरुच्या Ultraviolette Automotive या स्टार्टअप कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘F77’ सादर केली आहे. ही बाइक ‘लाइट्निंग’, ‘शॅडो’ आणि ‘लेजर’ अशा तीन व्हेरिअंट्समध्ये सादर करण्यात आलीये. 147 किलोमीटर प्रतितास इतका या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही बाइक 2.9 सेकंदात 0 ते 60 किलोमीटरचा वेग पकडते. तर, 7.5 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडते.
स्टँडर्ड चार्जरद्वारे 5 तासांमध्ये पूर्ण चार्ज –
या बाइकमध्ये एअर-कुल्ड ब्रशलेस डीसी (BLDC) मोटार असून 25 kW(33.5 bhp)आउटपूट आहे. या बाइकमधील बॅटरी पॅक स्टँडर्ड चार्जरद्वारे पाच तासांमध्ये पूर्ण चार्ज करता येईल. तर, पोर्टेबल फास्ट चार्जरद्वारे 50 मिनिटांत 0-80 टक्के चार्जिंग होते. तर पूर्ण चार्जिंगसाठी केवळ 90 मिनिटे लागतात. स्टँडर्ड चार्जर सामान्य पाच अँम्पिअर सॉकेटवर काम करतं, तर फास्ट चार्जरमध्ये 15 अँम्पिअर पावर सॉकेट आहे. F77 इलेक्ट्रिक बाइकमध्ये ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड असून यात 17 इंचाचे व्हिल्स आहेत. बाइकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स आहेत. यामध्ये ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटीसह फुल-कलर TFT स्क्रीन, ओव्हर-द-एअर अपडेट्ससाठी एक मोबाइल अॅप, बाइक लोकेटर आणि राइड अॅनालिसिस फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय , बाइकमध्ये मॅक्सिमम स्पीड लिमिटर आणि टॉर्क डिलिव्हरी कंट्रोलर, इमर्जंसी कॉन्टॅक्ट अलर्ट आणि फेल अँड क्रॅश सेंसर्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत.
आणखी वाचा- ‘बुलेट 350’ च्या किंमतीत वाढ, Royal Enfield ने केली घोषणा
3-3.5 लाख रुपये ऑन रोड किंमत –
3 लाख रुपये ते 3.25 लाख रुपये इतकी या बाइकच्या विविध व्हेरिअंट्सची किंमत आहे. इको, स्पोर्ट आणि इन्सेन अशा तीन रायडिंग मोड्समध्ये ही बाइक उपलब्ध आहे. या बाइकसाठी आगाऊ नोंदणीलाही सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक जणांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या बाइकची डिलिव्हरी सुरू होईल. यात तीन स्लिम आणि मॉड्युलर लिथियम-आयन बॅटरी पॅक्स असून, याद्वारे एकदा पूर्ण चार्जिंग झाल्यास 130-150 किलोमीटरची रेंज मिळते असा कंपनीचा दावा आहे.
First Published on November 14, 2019 1:34 pm