रूग्णालयात खासगीपणा जपण्यासाठी असलेल्या पडद्यांवर मोठय़ा प्रमाणात घातक जीवाणू असतात, त्यामुळे रूग्णांची आरोग्य सुरक्षा धोक्यात येते,असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘अमेरिकन जर्नल ऑफ इनफेक्षन कंट्रोल’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार कॅनडात विनीपेग येथे जळित व प्लास्टिक सर्जरी विभागाच्या केंद्रात लावण्यात आलेल्या पडद्यात जीवाणूंचे मोठे अस्तित्व दिसून आले. नवीन पडदे लावले तेव्हा त्यावर जीवाणूंचे प्रमाण कमी होते, पण जेव्हा ते जुने झाले तेव्हा त्यावर जीवाणूंची वाढ झालेली दिसून आली. चौदाव्या दिवशी ८७.५ टक्के पडद्यांवर मेथिसिलीनला दाद न देणाऱ्या स्टॅफिलोकॉकस ऑरस  जीवाणूंचे प्रमाण मोठे होते. या जीवाणूमुळे मरण्याचे प्रमाण जास्त आहे. जे पडदे नियंत्रित वातावरणात होते किंवा २१ दिवस स्वच्छ होते त्यात जीवाणू आढळले नाहीत. हे पडदे असलेल्या खोल्यात रूग्ण नव्हते त्यामुळे त्यावर जीवाणू आढळले नाहीत. चार पडदे हे चार बेडरूमध्ये लावले होते, तेथे जीवाणूंची संख्या मोठी होती. रूग्णांच्या खोलीत असलेल्या पडद्यांवर जीवाणूंचे प्रमाण जास्त होते. हे पडदे फारवेळा बदलले जात नाहीत, तरी तेथे या पडद्यांना स्पर्श होत राहतात. यावर, हे पडदे सतत  बदलून धुवून स्वच्छ करणे हा एकच मार्ग आहे असे संशोधकांचे म्हणणे आहे. २१ व्या दिवशी या पडद्यांवर दर सेंटीमीटरला अडीच पट जीवाणू वसाहती सापडल्या.