कोंबडय़ा व टर्कीच्या मांसापासून तयार केलेल्या पदार्थांत असलेल्या काही जीवाणूंमुळे मूत्रमार्गातील संसर्ग वाढतो असे संशोधनात दिसून आले आहे.

कोंबडी व टर्कीजन्य उत्पादनात इशेरिशिया कोलाय म्हणजे इ कोलाय नावाचे जीवाणू असतात त्यामुळे मूत्रमार्गाचा गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग अनेक लोक गांभीर्याने घेत नाहीत पण जेव्हा तो उग्र रूप धारण करतो तेव्हा त्याचा परिणाम मूत्रपिंडे व रक्तावर होऊन जीवावर बेतू शकते. जवळपास ८० टक्के रुग्णात मूत्रमार्गाचा संसर्ग हा इ कोलाय जीवाणूमळे होत असतो पण त्यातील काही प्रजातीच गंभीर संसर्गाला कारण ठरतात. इ कोलाय एसटी १३१ हा जीवाणू मूत्राशयातून रक्तात घुसतो व त्यामुळे दरवर्षी हजारो लोक मरतात. अनेक लोकांमध्ये इ कोलाय एसटी १३१ हा जीवाणू कुठून येतो हे अनुत्तरित होते पण तो कोंबडी व टर्कीचे मांस यातून माणसात येतो.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की इ कोलाय एसटी १३१ या जीवाणूचे काही प्रकार आहेत. त्यातील काही भेसळयुक्त कोंबडी मांसातून पसरतात. चिकन, टर्की व पोर्कच्या दुकानातील मांस आणून त्याचा अमेरिकेत एक वर्ष अभ्यास करण्यात आला. त्यात रक्त व लघवीचे नमुने घेण्यात आले. मांसाचेही नमुने घेतले, त्यातील ८० टक्के नमुन्यात हा जीवाणू दिसून आला. ७२ टक्के रुग्णांमध्ये या सदोष मांसातून हा जीवाणू पसरला.