अमेरिकेतील एका पशुवैद्यकीय रूग्णालयात नुकताच एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. या रूग्णालयात लॅब्राडोर जातीच्या एका कुत्र्याच्या पोटातून डॉक्टरांनी ६२ हेअरबॅंड, अंतर्वस्त्रांच्या ८ जोड्या आणि काही बँडेजस बाहेर काढली. पेनिसिल्व्हिया येथील गुड शेफर्ड पशुवैद्यकीय रूग्णालयात हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून मिळते आहे. टिकी नावाच्या या लॅब्राडोर जातीच्या कुत्र्याला गेल्या काही दिवसांपासून उलटी, जुलाब, अपचनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे या कुत्र्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांचा कोणताही फायदा होत नसल्याने अखेर त्याच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला. तेव्हा टिकीच्या पोटात असलेल्या गोष्टींचा साठा पाहून डॉक्टरही चक्रावले. त्यानंतर डॉक्टरांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून कुत्र्याच्या पोटातून ६२ हेअरबॅड, १६ अंतर्वस्त्रे आणि बँडेजस बाहेर काढल्या. जेव्हा डॉक्टर या गोष्टी एक एक करून बाहेर काढत होते तेव्हा शस्त्रक्रिया विभागात उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच डोळे विस्फारले होते. दरम्यान, टिकीच्या मालक सारा वेईस यांना या सगळ्याबद्दल विचारले असता त्यांनी एकदा त्यांच्या कुत्र्याने प्लॅस्टिक खाल्ले असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी ते त्याच्या विष्ठेतून बाहेर पडल्याचे सारा यांनी सांगितले.