महिलांचे सौंदर्य हे त्यांच्या केसात असते असे म्हणतात. पण त्यासाठी हे केस तितके छान असणे आवश्यक आहे. केस हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. यावर उपाय म्हणून महिला कधी पार्लरचा मार्ग धरतात तर कधी बाजारातील महागडी उत्पादने वापरतात. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे शाम्पू आणि कंडिशनर चांगला असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे केसांना लावण्यात येणारे तेलही चांगले असणे आवश्यक असते. केसांच्या पोतानुसार तेलाची निवड केल्यास ते केसांच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त ठरते.

१. केसगळती थांबवण्यासाठी आवळ्याचे तेल – आवळ्याच्या तेलात फॅटी अॅसिड असते. तसेच यामध्ये असणारे व्हीटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटसमुळे केसांची मुळे सुदृढ होण्यास मदत होते. त्यामुळे केसगळती आपोआप कमी होण्यास मदत होते.

२. डोक्याच्या त्वचेची खाज कमी करण्यासाठी तुळशीचे तेल – तुळशीमध्ये अँटीसेप्टीक आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. तसेच तुळशीत व्हीटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटसही असतात. यामुळे केवळ डोक्याच्या त्वचेचे आरोग्य राखले जात नाही तर डोकं शांत होण्यासाठीही या तेलाचा उपयोग होतो.

३. पांढऱ्या केसांसाठी खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने – कडीपत्त्याच्या पानांमुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच यामुळे मुळांना चांगले पोषण मिळते. कडीपत्त्याची पाने केसातील मेलानिन हा घटक टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे केसाचा मूळ रंग टिकून राहतो.

४. कोंड्यासाठी सायट्रस तेल – सायट्रस तेल हे व्हीटॅमिन सीने युक्त असते. तसेच यामध्ये दाहकता कमी करण्याचेही गुणधर्म असतात. म्हणून हे तेल लावल्याने खाज येण्यापासून सुटका मिळते आणि कोंडा कमी होण्यासही याचा उपयोग होतो.

५. केसांच्या वाढीसाठी जास्वंदाचे तेल – जास्वंदामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हीटॅमिन सी योग्य त्या प्रमाणात असते. हे दोन्हीही केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. या घटकांमुळे केसाच्या त्वचेचे पोषण होण्यास आणि त्यामुळे त्याची चांगली वाढ होण्यास मदत होते.