18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

रात्री झोपताना खोकला येतोय? 

घरगुती उपायांनी मिळेल आराम

डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन  | Updated: October 11, 2017 12:27 PM

थंडीचे दिवस आता फार दूर नाहीत. त्यातच पाऊस आणि वातावरणात सातत्याने होणारे बदल. या वातावरणात कोरड्या खोकल्याचे दिवसही आता लवकरच येणार. या काळात दिवसभर कोरड्या खोकल्याची ढास लागण्याचा त्रास अनेकांना होत असतो. रात्री तर हा खोकला पूर्ण हैराण करून सोडतो. खोकून खोकून त्या माणसाची छाती दुखू लागते. खोकल्याच्या सतत येणाऱ्या उबळीमुळे, ती व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण घराची झोपमोड होत राहते.

वैद्यकीयदृष्ट्या हा खोकला म्हणजे घशाची खवखव असते. घशात सूज येऊन तो कोरडा पडत असतो, घशाला शोष लागत असतो; पण त्यात कुठलाही जंतुसंसर्ग नसतो. त्यामुळे हा खोकला बरा होण्यासाठी अॅण्टिबायोटिक्सची गरज नसते. तसेच छाती पूर्ण मोकळी असल्यामुळे फुफ्फुसाचा एखादा आजार असण्याची किंवा होण्याची तशी फारशी काळजी नसते. मात्र असा कोरडा खोकला, जास्त काळ राहिला, तर डॉक्टरांकडून प्रथम काही वेगळा आजार नाही ना याची खात्री करून घेतल्यावर, काही सोप्या उपायांनी तो कमी करता येतो.

कमी वेळात ‘असा’ करा वर्कआऊट…

गुळण्या – रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या खळखळून गुळण्या करा. यामुळे घशामध्ये जमा झालेला स्त्राव स्वच्छ होतो आणि खवखव कमी होते. या गरम पाण्यात मीठ टाकले किंवा नाही टाकले तरीही चालते.

कोमट पाणी – रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेला ग्लास जवळ ठेवा. खोकल्याची उबळ आल्यास त्यातले दोन घोट पाणी प्या. यामुळे शोष कमी होतो आणि उबळ थांबते.

लवंग आणि मध – ४-५ लवंगा तव्यावर भाजून घ्याव्यात. थोड्या गार झाल्यावर, त्या कुटून त्याची पूड करावी. एका वाटीत तीन चमचे शुद्ध मध घेऊन त्याबरोबर लवंगांच्या चूर्णाचे मिश्रण करावे. हे चाटण दिवसभरात २-३ वेळा आणि रात्री झोपताना घ्यावे.

धूम्रपान – धूम्रपान बंद करावे. किमान रात्री झोपण्याआधी २-३ तास धूम्रपान टाळावे.

आहार – तळलेले पदार्थ, फरसाण, चिवडा, बाकरवडी असे कडक आणि तेलकट पदार्थ रात्री खाऊ नयेत. त्यांचा तवंग आणि पातळ थर घासत राहील्याने खवखव वाढते.

खोकल्यावरील गोळ्या – खोकला कमी होण्यासाठी मिळणाऱ्या, मेंथॉलयुक्त चघळून खाण्याच्या गोळ्या खाणे टाळावे. त्याने घसा जास्त कोरडा पडतो आणि खवखव वाढते.

ज्येष्ठमध – किराणा मालाच्या दुकानात मिळणारा ज्येष्ठमध हा मसाल्याचा पदार्थ असतो. काडीच्या स्वरूपात मिळणारा ज्येष्ठमध रात्री चघळत राहिल्यास खोकल्याची उबळ नक्की कमी होते.

सौंदर्य खुलवण्यापासून ते चिवट डाग घालवण्यापर्यंत, लिंबाच्या सालीचे सात फायदे

सुंठ-साखर – सुंठीची पूड साखरेत एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी.चहा- कृष्ण तुळशीची १५-२० पाने, ५-६ लवंगा, ५-६ मिरीचे दाणे, एक इंच लांब सुंठ एक जुडी गवती चहा, सुपारीच्या अर्ध्या खांडाएवढा गुळाचा एक खडा. हे सर्व नीट बिनदुधाच्या कोऱ्या चहात घालून रात्री प्यावे.

अडुळसा – अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून  ३-४  वेळा घ्यावा.

डेक्सोमिथार्फानयुक्त खोकल्याचे औषध रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे घ्यावे.

कोरडा खोकला आणि सर्दी असल्यास निलगिरीची पाने टाकून उकळत्या पाण्याची वाफ घ्यावी.

-डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

First Published on October 11, 2017 12:16 pm

Web Title: useful tips for dry cough home remedies