प्रथम शयनस्थिती घ्यावी. मग दोन्ही पाय जुळवावे. गुडघ्यात वाकवून दोन्ही हातांनी धरून त्याचा स्पर्श नाकाच्या टोकाला करण्याची क्रिया म्हणजे शयनद्विपादनासाग्रस्पर्शासन. जमिनीवर झोपावे, सावकाश दोन्ही पाय वर घ्यावेत म्हणजेच प्रथम द्विपादउत्तानपादासनात जावे. मग पाठीच्या दिशेला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी स्थिती घ्यावी. श्वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांची बोटे पकडावीत आणि ती हळूहळू नाकापर्यंत न्यावीत. हे करत असताना आपले डोके शयनस्थितीतून वर नेण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करावी. दृष्टी स्थिर ठेवावी. हळूहळू श्वास सोडत पाय पूर्वस्थितीत न्यावे. आसनस्थितीत कुंभक करावे.

१. या आसनामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते.

२. पाठीचा कणा मजबूत होतो.

३. कमरेभोवतीचा वात कमी होण्यास मदत होते.

४. शरीर हलके होते, पोट कमी होते.

५. पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी हे आसन नियमित करावे.

६. पचनक्रिया सुधारते. स्थुलता कमी होते.

७. हृदय मजबूत होते, शरीरस्वास्थ मिळते.

८. नाभीतील ग्रंथींचे कार्य सुधारते.

९. हातपाय कणखर होतात व गुडघेदुखी थांबते.

१०. दृष्टी स्थिर केल्यामुळे नेत्रदोष बरे होतात.

आसन करताना श्वसनाचे तंत्र राखावे. श्वास घेत घेत पाय वर उचलावेत. आसनस्थिती घेतल्यावर कुंभक करावे आणि आसनस्थिती सोडताना रेचक करावे. या आसनामुळे विचारात शुद्धता आणि प्रखरता येते. नजर स्थिर करून आपण अंगठय़ाकडे बघत असल्याने नेत्रदोष बरे होतात. शयन द्विपाद नासाग्रस्पर्शासन हे करायला अतिशय सोपे आहे. गुडघ्याची शत्रक्रिया झालेल्यांनी ३ वर्ष हे आसन करू नये. रोज नियमित केल्याने आपली फिगर मेंटेन होते. मात्र कोणतेही आसन करताना ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावे.