11 December 2017

News Flash

गॅसेसचा त्रास होतोय? हे आसन करा

इतरही अनेक फायदे

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ | Updated: October 3, 2017 12:24 PM

वेगवेगळ्या कारणांनी अनेकांना गॅसेसचा त्रास होतो. गॅसेस झाले की त्याच्याशी निगडीत इतर समस्या उद्भवण्याचीही शक्यता असके. मात्र नियमित तोलांगुलासन केल्यास या समस्येवर वेळेत नियंत्रण येण्यास मदत होते. तोल राखणारे आसन म्हणजे तोलांगुलासन ! यामध्ये शरीराचा आकार छान तराजूसारखा होतो. हे बैठक स्थितीतले आसन होय. हे आसन करताना, प्रथम पद्मासन घालावे. दोन्ही हाताचे पंजे नितंबाखाली खाली ठेवून झोपावे किंवा हातांच्या कोपराचा आधार घेऊन पद्मासनाची बैठक संपूर्ण उचलावी. तिचा भार कमरेपाशी आणावा. मग डोके जास्तीत जास्त पुढे उचलावे. अशा अवस्थेमधे श्वास रोखून धरता येईल तेवढा धरावा.

शरीर या ताणलेल्या अवस्थेत ठेवताना मग संथ श्वसन करावे. हळूहळू श्वास बाहेर टाकावा. डोळे उघडे ठेवून लक्ष नाभीस्थानावर केंद्रीत करावे. योगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली तोलांगुलासन जमते. सुरूवातीला ३० सेकंद एवढाच कालावधी ठेवावा. पण नित्य सरावाने हे आसन ३ मिनिटांपर्यंत टिकविता येते. यासाठी डोकेही शांत असणे आवश्यक असते. डोक्यात कोणतेही विचार सुरु असल्यास तोल साधणे अवघड होते.

…म्हणून नारळ पाणी असते आरोग्यदायी

यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय स्वर मधुर होतो, डोळे तेजस्वी दिसतात. नितंबांना आणि कंबरेलादेखील व्यायाम मिळतो. हात, खांदे सुदृढ बनतात. दमेकरी, क्षयरोगी व मधुमेहींनीसुद्धा हे आसन करावे. ज्वर, बद्धकोष्ठता बरा होतो. नितंबावरील सूज कमी होते. पाठीच्या कण्याचे कार्य सुधारते. ज्ञानतंतू अधिक कार्यक्षम होतात. पोटावर दाब आल्याने मलावरोध नाहीसा होतो. पुरूषांनी नियमित केले तर छाती भरदार व सुडौल बनते. मुरडादेखील बरा होतो. दृष्टी स्थिर केल्यामुळे डोळ्यातील ग्रंथीचे कार्य सुधारते. एकंदरीत तोल राखून अनेक फायदे देणारे हे तोलांगुलासन प्रत्येकाने जरूर करावे. मात्र कोणतेही आसन करताना ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ

First Published on October 3, 2017 12:24 pm

Web Title: useful yogasan for gases problem tolangulasan