खांदे मजबूत असतील तर आपण सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करु शकतो असे म्हटले जाते. उपहासाने असे बोलले जात असले तरीही खांद्यांमध्ये ताकद येण्यासाठी कोनासन अतिशय उपयुक्त असते. या आसनात शरीराचा आकार भूमितीतील कोनासारखा होत असल्याने या आसनाला कोनासन म्हणतात.

प्रथम शयनस्थिती घ्यावी. मग पाय समोरील बाजूस सरळ रेषेत ठेवावेत. नंतर हाताचे पंजे मागे न्यावेत. हात ताठ ठेवावेत. श्वास घेऊन हातांच्या, पंजाच्या व टाचांच्या मदतीने शरीर वर उचलावे, मान मागील बाजूस वर उचलावी, दोन्ही हात सरळ ठेवावेत, छाती सरळ वरच्या दिशेने वर न्यावी. या आसनामुळे दोन्ही हातांच्या पंजावर आणि पायांच्या टाचांवर भार येतो. पण त्यातूनच शरीर संतुलित राहते. दिवसातून २ ते ४ वेळा हे आसन करावे. सुरुवातीला साधारण ८ ते १० सेकंदापर्यंत टिकविण्याचा प्रयत्न करावा. या आसनाने खांदे मजबूत होतात. पायाला आणि मेरूदंडाला चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे त्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते.

या आसनाला पश्चिमोत्तानासनाचे उपआसन म्हणूनही संबोधले जाते. या आसनामुळे पोटाच्या तक्रारीदेखील दूर होतात. कोनासन नियमित केल्यामुळे हातपाय तर मजबूत होतातच पण शरीराला योग्य आकारही प्राप्त होतो. कमरेची दुखणी दूर होतात. शरीराचा बोजा हा हाता-पायाचा पंजा आणि टाचांवर येत असल्यामुळे काही प्रमाणात शीर्षासनाचेही फायदे या आसनाने मिळतात. पुरूष स्त्रियांचे लैंगिक प्रश्नसुद्धा हे आसन नियमित केल्यामुळे दूर होतात. मान मागील बाजूस वाकवल्यामुळे मानेचे स्नायू मजबूत होतात. हात आणि पाय यांच्यावर दाब पडल्यामुळे शरीराचा समतोल साधता येतो. तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन व्यवस्थित जमू शकते.

पाय सरळ रेषेत ताठ ठेवल्याने गुडघ्यांनाही चांगल्याप्रकारे व्यायाम मिळतो. ज्यांना हातापायांना जखमा झाल्या असतील किंवा लागले असेल. त्यांनी हे आसन करताना योग्य ती काळजी घ्यावी. मुख्यत्वे वृद्धात्वाकडे झुकणारे खांदे हे या आसनाने मजबूत होतात. पायाच्या टाचा आणि हाताचे पंजे यांना शक्ती प्राप्त होते. आसन सोडताना हळूहळू सोडावे. पोटाचे विकार असलेल्यांनी पोटाला ताण सहन होईल इतपतच हे आसन करावे. पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास आसन करताना वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ