कधी गाणी ऐकण्यासाठी तर कधी फोनवर बोलण्यासाठी चालताना किंवा गाडीवर आणि बस, टॅक्सी, ट्रेनच्या प्रवासात अनेकजण सर्रास इअरफोन्स वापरतात. इअरफोन्समुळे कानाच्या पडद्यांना त्रास होत असल्याने विशिष्ट मर्यादेतच यातून आवाज ऐकावा, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र, बरेचजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. घाईघाईत आपण मित्रमैत्रिणींकडून किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून त्यांचे इअरफोन्स घेतो आणि आपली गरज भागवतो. यामुळे आपले त्यावेळेचे काम होत असेल तरीही ही सवय आरोग्यावर विपरित परिणाम करणारी आहे हे वेळीच समजून घ्यायला हवे.

आता हे झाले इअरफोन्सच्या वापराच्या बाबतीत. मात्र, तुम्ही दुसऱ्याचे इअरफोन्स वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण यापासून तुमच्या आरोग्याला धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता ते कसे काय? तर त्यामागे काही विशिष्ट कारणे आहेत आणि आपले आरोग्य सांभाळण्यासाठी त्याचा योग्यदृष्टीने वेळीच विचार व्हायला हवा, पाहुयात दुसऱ्याचे इअरफोन्स वापरल्याने काय तोटे होतात…

१. एकमेकांचे इअरफोन्स वापरल्याने कानातील विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कानाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. कानात तयार होणारा नैसर्गिक मळ हा कानाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असतो. पण यामध्ये विषाणूंची वाढ होण्याची शक्यता असते.

२. तुम्ही स्पंज असलेला इअरफोन वापरत असाल तर ते स्पंज नियमित किमान महिन्याभराने बदलणे गरजेचे आहे. या स्पंजमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

३. काही जणांना कानात कोंडा होतो. तसेच महिला कानातले घालत असल्याने त्यांना त्याठिकाणी जखमा होतात. याशिवाय इतरही काही कारणांनी कानांमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. या जखमांमुळे विषाणूंचा धोका वाढतो आणि त्वचारोग पसरण्याची शक्यताही जास्त असते.

४. कान हा शरीराचा नाजूक भाग आहे. कानाला काही त्रास झाल्यास त्याचा थेट आपल्या ऐकण्याशी संबंध असल्याने अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळ आपण वापरत असलेले इअरफोन्स स्वच्छ असणे आवश्यक असते. अनेकदा घाईगडबडीत आपण इअरफोन्स कुठेही ठेवतो. त्यावेळी त्याला धूळ आणि इतर अनावश्यक घटक चिकटतात. तसेच इअरफोन्स कानात घातल्याने त्यामुळे जंतूंसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे इअरफोन्स स्वच्छ जागी ठेवणे आवश्यक आहे.

५. बाजारात नामांकित कंपन्यांच्या ब्रँडेड इयरफोन्सबरोबरच अगदी स्वस्तातील मिळणारे इयरफोन्सही उपलब्ध असतात. त्यांची गुणवत्ता अतिशय कमी दर्जाची असल्याने त्यातून येणारा आवाज आपल्या कानांसाठी धोक्याचा ठरु शकतो. त्यामुळे असे इअरफोन्स घेणे टाळावे. अन्यथा कानांना इजा होण्याची शक्यता असते.