लंडन : सामुदायिक लसीकरणाच्या मोहिमेतून इबोलाच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत होऊ शकणार नसल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील केंट विद्यापीठातील संशोधकांनी इबोला विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या संभावनांचे विश्लेषण केले. यातून येणाऱ्या काही काळापर्यंत इबोला विषाणूच्या उपद्रवाला आळा घालणे हे अशा प्रकरणांचे पर्यवेक्षण आणि त्यांना वेगळे करणे यावर अवलंबून असणार आहे, असे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काँगोमध्ये नव्या इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची माहिती दिली आहे. सामुदायिक रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात इबोलाची लागण होण्याची संभावना असणाऱ्या लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार आहे. उद्रेकादरम्यान इबोला संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे सरासरी चार किंवा त्याहून अधिक लोकांना संसर्ग होतो यामुळे हा रोग वेगाने पसरतो. यामुळे रोगाची लागण होण्यास आळा घालण्यासाठी ८० टक्के लोकसंख्येला लसीकरणाची गरज आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसीकरण करणे सद्य:स्थितीत अशक्य असून पश्चिम आफ्रिकेच्या इबोलाची साथ पसरली असताना इबोलाशी संपर्क आलेल्यांपैकी केवळ ४९ टक्के लोकांचेच लसीकरण करण्यात आले होते. रोगाची लागण झाली असूनदेखील ३४ टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला.

लसीकरणामुळे दीर्घकाळ इबोलापासून संरक्षण मिळते का नाही हे अदय़ाप अस्पष्ट आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात लसीकरणाची मोहीम ही खर्चीक आणि अव्यवहार्य असल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे.