फ्लूच्या विषाणूवर हल्ला करणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशी शोधण्यात यश आले असून आता सर्व प्रकारच्या फ्लूवर परिणामकारक ठरणारी लस तयार करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत या रोगावर रामबाण उपाय सापडत नव्हता. रक्तातील अतिशय सूक्ष्म अशा प्रतिकारशक्ती पेशी फ्लूचा विषाणू आधीच्या संसर्गात कशा प्रकारचा होता हे लक्षात ठेवू शकतात. असे मेलबर्न विद्यापीठाने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

जर आक्रमक विषाणू कोण आहे हे त्यांना ओळखता येत आहे तर त्यांच्यातील गुणांचा वापर फ्लूच्या विषाणूंना रोखण्यासाठी करता येऊ शकतो.  सीडी ८ प्लस या टी पेशी  फ्लूवरील लस तयार करण्यासाठी उपयोगी आहेत. त्यातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती माणसाला आयुष्यभर फ्लूच्या विषाणूंची लागण होऊ देणार नाही. विषाणूंवर या पेशी नेहमीच आक्रमक हल्ला चढवत असतात. नेचर इम्युनॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार इन्फ्लुएंझाच्या ए, बी व सी या सर्व प्रकारच्या विषाणूवर या मारक पेशी परिणामकारक ठरतात. मारक पेशींचे काम बघून आम्ही आश्चर्यचकित झालो असे मेलबर्न विद्यापीठाच्या कॅथरिन केडझिरस्का यांनी सांगितले. फुदान विद्यापीठाच्या वैज्ञानिकांसमवेत या वैज्ञानिकांनी काम केले असून त्यात चीनमधील २०१३ मधील एन्फ्लुएंझा साथीतील रुग्णांच्या प्रतिसादाचा विचार करण्यात आला होता. ती साथ बर्डफ्लूची होती. त्यात ‘ए’ प्रकारच्या विषाणूची लागण होऊन अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  यात ९० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील ३५ टक्के मरण पावले होते. ज्या रुग्णांमध्ये दोन ते तीन आठवडय़ात फरक पडला होता त्यांच्यात सीडी आठ प्लस टी पेशी जास्त होत्या. जे मरण पावले त्यांच्यात त्यांचे प्रमाण फार कमी होते.