News Flash

तिळगूळ पोळी

साहित्य : सारणाकरिता १ वाटी तीळ, २ चमचे बेसन, ३/४ वाटी गूळ, सुके खोबऱ्याचा कीस...

साहित्य : सारणाकरिता १ वाटी तीळ, २ चमचे बेसन, ३/४ वाटी गूळ, सुके खोबऱ्याचा कीस, १ छोटा चमचा सुंठ पावडर, १ चमचा वेलची पावडर, पोळीकरिता अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा, चवीपुरते मीठ, २ चमचे तेल.

कृती : सारणाकरिता तीळ, सुके खोबऱ्याचा कीस, बेसन थोडे भाजून घ्यावे.  गूळ सुरीने थोडा बारीक करावा. तीळ, खोबऱ्याचा कीस, गूळ मिक्सरमध्ये एकत्र फिरवावा. नंतर त्यात बेसन, सुंठ, वेलची पावडर घालून एकत्र करावे. पोळीकरिता कणीक, मैदा एकत्र करून त्यामध्ये तेल आणि चवीपुरते मीठ घालून थोडे घट्टच भिजवावे.

कणकेचा एक छोटा गोळा घेऊन, पुरणपोळीसारखेच त्याचा उंडा करून त्यात तिळगुळाचे सारण भरून हलक्या हातानेच बारीक लाटावी. तव्यावर कमी आचेवर दोन्ही बाजूने शेकून कडक करावी. तुपाबरोबर खाण्यास द्यावी.

टीप : गूळ जास्त कडक वाटल्यास, एका बंद डब्यात ठेवून कुकरमध्ये वाफवून घ्यावा. नंतर त्यामध्ये तिळपूड, बेसन, सुंठ पावडर, वेलची एकत्र करावे. ही पोळी १०-१२ दिवस टिकते.

हादग्याच्या फुलांची कोशिंबीर

साहित्य : १५-२० हादग्याची फुले, अर्धी वाटी दही, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा उडीद डाळ, हिंग, चवीपुरता मीठ आणि साखर.

कृती : हादग्याची फुलांची मागची देठे काढून फूल सुरीने बारीक कापावे.  तेलात जिरे, हिंग, हिरवी मिरची, उडीद डाळ घालून फोडणी करावी, त्यामध्ये कापलेली फुले घालून एक ते दोन मिनिटे परतावे. लगेच गॅस बंद करावा. नंतर त्यामध्ये दही, चवीपुरते मीठ आणि साखर घालून एकत्र करावे. वरून कोथिंबीर घालून वाढावे.

टीप : फुलांची मागची देठे उन्हात वाळवून तेलात तळावी. वरून तिखट-मीठ भुरभुरावे. खिचडीबरोबर खाण्यास चविष्ट लागतात.

हादग्याची फुले पावसाळा किंवा हिवाळ्यातच मिळतात आणि फार क्वचित मिळतात, त्यामुळे हे पदार्थ विरळच होत आहेत.

शेवग्याच्या फुलांची भाजी

साहित्य : १ वाटी शेवग्याची फुले, १ कांदा बारीक चिरलेला, २ चमचे मुगाची डाळ, हळद, हिरवी मिरची, ओले खोबरे, चवीपुरते मीठ, साखर.

कृती : शेवग्याची फुले निवडून, बारीक काडय़ा साफ करून, पाण्याने धुवावे. एका पातेल्यात तेल घालून जिरे-मोहरीची फोडणी करावी, त्यात आवडीनुसार हिरवी किंवा सुके लाल मिरचीचे तुकडे घालावे. कांदा घालून परतावे. आता भिजलेली मुगाची डाळ, एक चमचा हळद घाला. डाळ शिजल्यावर, शेवग्याची फुले घालून मध्यम आचेवर शिजवा. फुले लगेच शिजतात, एक-दोन वाफ आल्यावर, ओले खोबरे, मीठ आणि साखर घालून एकत्र करा. नंतर एक वाफ आल्यावर गॅस बंद करा. पोळी किंवा भाकरीबरोबर छान लागते.

तिळाची चिक्की

साहित्य : १ वाटी तीळ, १ वाटी साखर, १ चमचा तूप, बारीक काजूचे तुकडे, वेलची दाणे.

कृती : तीळ थोडे कढईत भाजून घ्यावे. नंतर कढईत एक चमचा तूप गरम करावे. त्यामध्ये साखर घालावी. साखर पूर्ण विरघळेपर्यंत सारखे हलवत राहा. साखर पूर्ण विरघळल्यावर आच बंद करावी आणि लगेच तीळ, काजू तुकडे, वेलची घालून एकत्र करावे.

हे मिश्रण तूप लावलेल्या लाकडी पोळपाटावर किंवा कटिंग बोर्डवर घेऊन लाटण्याने लगेच बारीक पसरावे. सुरीने वडय़ा पाडाव्यात. वडय़ा लवकर सुटतात. ही तिळाची चिक्की छान कुरकुरीत होते, लहान मुले आवडीने खातात. टीप : साखरेऐवजी गूळ पण वापरू शकतात.
राजश्री नवलाखे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:05 am

Web Title: vachak chef 3
टॅग : Cooking
Next Stories
1 कर्करोगग्रस्त पेशींमध्ये साखरेचे अधिक प्रमाण
2 मद्यपानामुळे किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब
3 तंबाखूजन्य पदार्थ आवश्यक आहारापेक्षा स्वस्त
Just Now!
X