शाकाहारी लॉरा ट्रेसी मित्रांबरोबर सहलीला गेली असताना तिच्या बोटाला पिरान्हा नावाचा मासा कडकडून चावला. माशावरील रागामुळे आपली शाकाहाराची सवय बाजूला ठेऊन या युवतीने चक्क तो मासा खाल्ला!
२० वर्षांची लॉरा पेरु-बोलिव्हियाच्या सीमेवर ‘टीटीकाका’ तलावात छोटे मासे पकडून पुन्हा तलावात सोडत असताना करवतीसारखे धारदार दात असलेला पिरान्हा मासा तिच्या गळाला लागला. उत्सुकतेपोटी हा मोठा मासा हातात घेताच त्याने धारधार दातांनी तिच्या हाताच्या बोटाचा कडकडून चावा घेतला. माशाने चावा घेतलेल्या बोटाचे मास बाहेर आले आणि घळाघळा रक्त वाहू लागले. तिला प्रचंड वेदना जाणवू लागल्या. अचानक ओढवलेल्या आणि काही क्षणात घडलेल्या या प्रसंगाने ती गांगरून गेली. झाला प्रकार कळल्यावर तिचा यावर विश्वासच बसला नाही.

वेदनेने व्याकूळ झालेल्या लॉराने त्या माशावरील रागातून चक्क तो मासा खाल्ला.  लॉरा म्हणाली, पिरान्हा पकडण्याच्या वेदनामय प्रकारामुळे मी त्या माशाला खाल्ले. तो अगदीच बेचव होता आणि मी खूप निराश झाले.

लॉराने प्राथमिक उपचार म्हणून जखमेवर टीशू पेपरचे बॅन्डेज बांधले. दोन दिवसानंतर तिला खूप वेदना जाणवू लागल्याने ती हॉस्पिटलमध्ये भरती झाली. तात्काळ उपचारासाठी न आल्याने डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले. बराच काळ लोटला असल्याने जखमेच्या ठिकाणी इन्फेक्शन झाले होते. डक्टरांनी जखम साफ करून, तिला प्रतिजैविक औषध दिले. बोट वाचवण्यासाठी तिच्यावर चार दिवस उपचार करण्यात आले. लॉरा आता घरी आली असून, तिच्या बोटावरील जखमेचा सहा इंचाचा व्रण तिला नेहमीच या घटनेची आठवण करून देत राहणार आहे.
सौजन्य – mirror.co.uk