News Flash

भरुदड नव्हे, लाभच!

रस्ते अपघात व वाहन प्रदूषण कमी करण्याकरिता वाहने अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त व शुन्य प्रदूषण करणारी असली पाहिजेत.

|| अनिल पंतोजी

वाहन आयुर्मर्यादा निश्चिती धोरण

वाहन आयुर्मर्यादा निश्चिती धोरण…यामुळे वाहन प्रदूषणाची समस्या ही कमी होण्यास मदत होईल. जुन्या वाहनांमध्ये सुरक्षा प्रणालींचा वापर नसल्याने  अपघातात मोठी जीवित हानी होत असते, तीही कमी होत रस्ते सुरक्षीत होतीलच, शिवाय सद्या इंधनाचे दर पाहता जुनी वाहने सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत, तोही भरुदड कमी होईल..त्यामुळे हे धोरण लाभदायी ठरेल अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यानी या वर्षांचे अंदाजपत्रक सादर करताना वाहन उद्योग क्षेत्राला चालना मिळण्याकरिता सरकार वाहन आयुर्मर्यादा निश्चिती धोरणाची घोषणा नजीकच्या काळात करेल असे जाहीर केले हाते. त्यास अनुसरून केंद्रीय परिवहन मंत्र्यानी ऐच्छिक वाहन आयुमर्यादा निश्चिती धोरणाचा मसुदा नुकताच लोकसभेत सादर केला.

शहरात किंवा ग्रामीण भागात फेरफटका मारत असताना आपणास रस्त्याच्या आसपास अनेक जुनी, नादुरुस्त, जळमट लागलेली, धूळ खात पडलेली वाहने दिसून येतात. याचे मुख्य कारण वाहन नोंदणी रद्द करण्याच्या कायदेशीर पद्धतीची क्लिष्टता व माहितीचा अभाव.

देशातील नोंदणी पटावरील वाहन संख्या व अस्तित्वातील वाहन संख्या यात निश्चित तफावत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आपणास वाहतुकीची कोंडी, प्रदूषण, अपघात व वाढते गुन्हेगारीकरण या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्वित्र्झलँड मधील ‘आयक्यूएअर’ या संस्थेच्या अहवालानुसार जगातील ३० प्रदूषित शहरांपकी भारतातील २२ शहरांचा समावेश आहे. वाढत्या प्रदूषणास ही वाहने मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहेत.

रस्ते अपघात व वाहन प्रदूषण कमी करण्याकरिता वाहने अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त व शुन्य प्रदूषण करणारी असली पाहिजेत. आज आपण ‘भारत स्टेज ६’ मानक असलेले वाहन वापरत आहोत. तसेच सी.एन.जी., एल.पी.जी. इलेक्ट्रिक या विविध इंधनावर चालणारी व प्रदूषण न करणारी वाहनेदेखील लोकप्रिय होत आहेत. या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणास आळा बसणार आहे. वाहनांची निर्मिती करताना अपघातपूर्व व अपघातपश्चात सुरक्षा तंत्रावर विशेष भर दिला जात आहे. या उपाययोजनांमुळे अपघात टाळण्यास मदत होईल. जर अपघात झाल्यास या तंत्रज्ञानामुळे जीवित हानी टाळता येऊ शकते.

रस्ता सुरक्षा व वाहन क्षेत्राला उभारी देण्याकरिता मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा आधार घेत शासनाने वाहनांची आयुर्मर्यादा निश्चित केली आहे. खाजगी वाहनाची आयुमर्यादा २० वर्ष आहे तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्ष आहे. आपण पुन्हा एकदा लक्षात घेतले पाहिजे की हे धोरण ऐच्छिक आहे. शासनाने या धोरणाची अंमलबजावणी सुरुवात स्वत पासून केली आहे व स्वतची (शासनाची) १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने तोडून भंगारात काढणार आहे.

वाहनांच्या तांत्रिक तपासणीकरिता शासन प्रत्येक जिल्ह्यत कमीत-कमी एक वाहन तपासणी केंद्र विकसित करणार आहे. या केंद्रामधील अद्ययावत यंत्रणेद्वारे वाहन तपासणी केली जाईल. तसेच सरकारने वाहन तोडणी सुविधा केंद्राकरिता (स्क्रॅप सेंटर्स) नवीन नियमावली तयार केली आहे.

विहित आयुर्मर्यादा समाप्त झालेल्या वाहनांची तांत्रिक तपासणी या केंद्रातूनच होणार आहे. वाहन तांत्रिक तपासणीत योग्य आढळल्यास त्याच्या नोंदणीचा कालावधी वाढविण्यात येईल. परंतु त्यास आवश्यक नोंदणी शुल्क व पर्यावरण कर या दोन्ही मध्ये शासनाने भरीव वाढ केली आहे. जेणेकरून वाहन मालक असे जुने वाहन चालवण्यास परावृत्त होणार नाही. तसेच तपासणीमध्ये वाहन तांत्रिकदृष्टय़ा अयोग्य आढळल्यास वाहनांची नोंदणी रद्द  केली जाईल.

आयुर्मर्यादा संपलेले वाहन रस्त्यावर उपयोगात आणत असल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाईल. नोंदणी रद्द केलेले वाहन फक्त अधिकृतवाहन तोडणी सुविधा केंद्राच्याद्वारे भंगारात काढले जाईल. वाहन निर्मिती व उत्पादनात अनेक सुट्टय़ा भागांचा समावेश असतो. विविध प्रकारचे धातू, रबर, प्लॅस्टिक, काच यांनी वाहन बनलेले असते. वाहनांची तोडणी करत असताना सुट्टय़ा भागांची विभागणी केल्यास त्यांच्यावर पुनप्रक्रिया करता येईल व त्यामुळे वाहन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

या वाहनांना तोडणी सुविधा केंद्राद्वारे वाहनाच्या किंमतीच्या ४ ते ६ टक्के वाहन मूल्य मोबदला मिळेल. सोबतच हे केंद्र तोडणी प्रमाणपत्र मालकांना जारी करेल. तोडणी प्रमाणपत्र वाहन खरेदी करणाऱ्यान वाहन वितरक/उत्पादक यांना सादर केल्यास वाहनाच्या किंमतीत ५ टक्के सूट देण्याची मार्गदर्शक सूचना उत्पादकांना शासनाने दिलेली आहे.

या योजनेअंतर्गत नवीन वाहन घेतलेल्या धारकास वाहन नोंदणी शुल्क माफ केले जाईल व वाहन करात भरघोस सवलत द्यावी अशी सूचना केंद्र सरकार देणार आहे. या धोरणामुळे रस्ते सुरक्षित होतीलच, परंतु रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व शासनाला विविध कररूपी महसुलात वाढ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:31 pm

Web Title: vehicle life limit determination policy akp 94
Next Stories
1 भारतात 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Vivo V20, जाणून घ्या नवीन किंमत आणि खासियत
2 108MP कॅमेरा क्षमतेच्या Redmi Note 10 Pro Max चा ‘सेल’, जाणून घ्या किंमत आणि खासियत
3 फक्त तीन दिवसात विकले 2300 कोटी रुपयांचे फोन, लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात ‘बंपर’ विक्री
Just Now!
X