विदर्भात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) वनौषधी लागवडीस मोठा वाव असून त्याला बाजारमूल्यही आहे. अशा वनस्पतींची गटसमूहाने लागवड करून प्रक्रिया व मूल्यवृद्धी केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक फायदा होईल, असे मत विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केले.
मनरेगाअंतर्गत सिव्हिल लाईन्समधील बीएसएनएलच्या सभागृहात विभागस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी उपायुक्त एम.ए.एच. खान, कृषी अधीक्षक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील औषधी वनस्पतीतज्ज्ञ आर.बी. सरोदे, नागपुरातील कृषी महाविद्यालयातील फलोत्पादनतज्ज्ञ डॉ. गजभिये, शैल मेडी फार्मसचे राजेंद्र काळे, संजय सिन्हा, सुनील माणकीकर, विजय कोळेकर प्रामुख्याने उपस्थित होते. वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हळदीसारखे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर पीक शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या घेऊन प्रक्रिया व मूल्यवृद्धी केल्यास फायदेशीर ठरू शकते, असेही अनुप कुमार म्हणाले. राज्याचे मनरेगा आयुक्त संकरनारायणन यांनी मनरेगा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीची माहिती दिली.
या कार्यशाळेत उदय पाटील यांनी फळबाग लागवड, इस्रायल पद्धतीने संत्रा लागवड, डॉ. आर.बी. सरोदे यांनी औषधी वनस्पती लागवड, डॉ. आर.बी. गजभिये यांनी हळद लागवड, राजेंद्र काळे यांनी पूर्व विदर्भातील विविध औषधी वनस्पतींना असलेला वाव, त्याचे अर्थकारण, बाजारमूल्य, विक्रीव्यवस्था याबाबत माहिती दिली. संजय सिन्हा यांनी पामारोझा गवतावरील (तिखाडी) प्रक्रिया व विक्रीव्यवस्था, रवींद्र भोसले यांनी मग्रारोहयोअंतर्गत कृषीविषयक अनुज्ञेय कामे, सुनील मानकीकर यांनी औषघी वनस्पती लागवडीस असलेला वाव, विजय कोळेकर यांनी भात लागवडीसाठी कृषी यांत्रिकीकरण, या विषयावर सविस्तर माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित केलेले भामरागड तालुक्यातील जिजगाव येथील प्रगतिशील शेतकरी सीताराम मडावी यांनी श्री पद्धतीने भात लागवडीची माहिती सादरीकरणाद्वारे सांगितली. एम.ए.एच. खान यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.