News Flash

तंत्रज्ञान : डिजिटल धक्का!

व्हर्च्युअल आरसाही प्रत्यक्षात आला

प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेली माहिती आणि तिचे क्षणभरात विश्लेषण ही ताकद आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांना प्राप्त झाली आहे. हा सारा प्रवास डिजिटल असणार आहे, त्यामुळेच फ्युचर डिकोडेड परिषदेने दिलेला डिजिटल धक्का महत्त्वाच ठरतो.

शॉपिंग हा अनेकांच्या आवडीचा विषय असला तरी प्रत्येक वेळेस ट्रायल रूममध्ये शिरा, कपडे बदला, बाहेर उभ्या असलेल्या कुटुंबीयांना परत बाहेर येऊन प्रदर्शनाप्रमाणे दाखवा याचा अनेकांना कंटाळा असतो. त्यातही आणखी कंटाळा येतो तो ट्रायल रूमबाहेर असलेल्या रांगेचा. अनेकांना वरातच वाटते ती. पण भविष्यातील मॉलमध्ये कदाचित त्या ट्रायल रूमशिवायच आपण कपडे घालून पाहू. अर्थात कपडे समोरच असतील, त्याचा पोतही हातांनी हाताळलेला असेल पण ते प्रत्यक्ष घालणार मात्र नाही. जे घातले जातील ते व्हच्र्युअल कपडे असतील. समोर असेल एक मोठ्ठा स्क्रीन. स्क्रीनच्या दिशेने हात हलवायचा आणि समोर असलेले कपडे निवडायचे. ते कपडे घातल्यानंतर आपण कसे दिसतो ते समोरच्या त्या व्हच्र्युअल आरशावर दिसू लागेल केवळ एकाच बाजूने नव्हे तर आपल्याला पुढून, मागून एका बाजूने कसे दिसतो, ते सारे इथे कळणार आहे. आपण वळलो की, समोरच्या स्क्रीनवर त्याप्रमाणेच दिसणार.. आपण उभे राहणार तिथे आजूबाजूला असलेले सेन्सर्स आपली मापं घेणार असून त्यानुसार त्या व्हच्र्युअल स्क्रीनवर आपल्या अंगावर कपडे चढतील आणि आपल्याला आपण त्या कपडय़ांत कसे दिसतो ते दिसेलही! हे सारे प्रत्यक्षात घडण्यासाठी आपल्याला थांबण्याची गरज नाही. कारण येत्या काही महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान आपल्या शेजारच्या मॉलमध्ये आलेलेही असेल!
योगर्ट तयार करणारी कंपनी. पूर्वी इथे खूप माणसं कामं करायची. पण आता माणसं नाहीतच कारण रोबोटस् काम करतात. अगदी दूध येण्यापासून ते त्याचे मापन करून, त्यावर चाचण्या करेपर्यंत सारे काही काम यांत्रिक पद्धतीने होते. त्यावर प्रक्रिया करण्यापासून ते नंतरच्या पॅकिंग आणि माल गाडीत भरण्यापर्यंतच्या प्रवासात कुठेही माणसाचा अंतर्भाव नाही. देशभरात पसरलेल्या दुकानांमध्ये कोणत्या फ्रिजमधील माल कमी झाला आहे आणि कुठे अधिक मागणी आहे, हे सारे केवळ क्लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर होते आहे. उत्पादन ज्याला हवे आहे तो ग्राहक सोडला तर मानवी हस्तक्षेप संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही नाही!
तुम्ही नवीन घर घ्यायचा निर्णय घेतला आहे. विशिष्ट परिसरात घर शोधताय त्याच वेळेस तुमच्या टॅब्लेट किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर परिसरात उपलब्ध असलेल्या घरांच्या किमतीसह एक तक्ता येतो. त्यामध्ये त्या घरांची सर्व माहिती दिलेली असते. एजंट असेल तर त्याचीही माहिती. त्याची विश्वासार्हता किती याचे मानांकनही सोबत केलेले असते. तुम्ही म्हणजे नवरा-बायको एकाच चॅटबॉक्समध्ये तुमचे विचार व्यक्त करू शकता आणि सर्व संदर्भही पाहू शकता. घराच्या डिझाइनमध्ये हव्या त्या गोष्टी इंटिरिअरसाठी घेतल्या की, घर कसे दिसेल, त्याचे व्हच्र्युअल डिझाइनही बाजूच्याच चौकटीत पाहायला मिळते. शिवाय या इंटिरिअर व घरातील कोणत्या वयोगटाच्या किती व्यक्ती आहेत हे ताडून त्यानुसार कोणता फ्रिज चांगला किंवा कोणत्या कंपनीचे वॉशिंग मशीन चांगले याचीही माहिती सोबत येत असते. त्यात गोष्टी तुम्ही केवळ सिलेक्ट करून ठेवायच्या, की मग तुमच्या आजूबाजूला त्या नेमक्या कोणत्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, त्याचीही माहिती वेगळ्या चौकटीत येते. त्याचा एक क्यूआर कोड तयार होतो. आता तुम्ही वेळ मिळाल्यावर एखाद्या स्टोअर्समध्ये प्रवेश करता त्या वेळेस तो क्यूआर कोड अ‍ॅक्टिवेट होतो आणि मग तुम्ही निवडलेल्या वस्तू नेमक्या कुठे आहेत ते समजते, शोधावे लागत नाही. शिवाय त्या वस्तूच्या वर असलेला क्यूआर कोड स्कॅन झाला की, आजूबाजूच्या कोणत्या स्टोअर्समध्ये किती किमतीला त्या वस्तू उपलब्ध आहेत, कुठे चांगली स्कीम सुरू आहे, कुठे विशेष ऑफर सुरू आहे, याचीही माहिती टॅब्लेट किंवा मोबाइलवर येते. प्रत्यक्ष वस्तू पाहा ऑनलाइन खरेदी करा आणि घरी जा. तुमची वस्तू केव्हा पोहोचेल त्याचे अपडेटही मिळत राहतील.. व्हच्र्युअल आणि प्रत्यक्ष याचा अनोखा संगमच.
तिसरा अनुभव.. एका स्मार्ट कारचा. ही कारच तुमच्या पर्सनल असिस्टंट अर्थात पीएचे काम पाहते. कार कनेक्टेड असते तुम्ही दिलेली वेळ जवळ येत गेली की, तुम्हाला मोबाइल ट्रॅफिक अपडेट येऊ लागतात. जाण्याच्या कोणत्या मार्गावर किती ट्रॅफिक आहे. तुम्ही कारमध्ये बसता तेव्हा ‘कोर्टाना’ अर्थात हा पर्सनल असिस्टंट आवाजाद्वारे सांगतो आणि मार्ग कोणता स्वीकारायचा ते निवडायला सांगतो. गाडी चालवीत असताना तो दिवसभराच्या कामांची आठवण करून देतो. मध्येच एखादा मेल आला तर वाचून दाखवू का विचारतो. तुम्ही सांगितल्यानंतर वाचूनही दाखवतो. उत्तर द्यायचे आहे का विचारतो. तुम्ही केवळ बोलत जायचे तो टाइप करतो आणि सेंड म्हटलेत की, मेलला उत्तरही रवाना करतो. तो तुमची सारी कामे हलकी करतो. मग आईला फोन करायचा आहे, वेळेस औषध घेतले का विचारायला. मुलाच्या शिक्षकांशी बोलायचे राहिले आहे. हे सारे सांगतो, आठवण करून देतो. मुलाची तब्येत आज तेवढी बरी नाही, थोडी काळजी घ्यायला सांगा व तुम्हीही मध्येच शिक्षकांना फोन करून विचारा, हेही सांगायला विसरत नाही. थोडासा विलंब झाल्यानंतर असेच निघून गेल्यावर गाडीचा हेडलाइट सुरूच राहिलाय तो ऑफ करू या का, असे मोबाइलवर विचारतो. आणि तुम्ही हो म्हणायच्या आधीच ऑटो पद्धतीने तो ऑफही करतो. वरती चार तासांची ऊर्जा वाचवली असे गमतीत सांगतोही.. हे सारे स्वप्नाप्रमाणे भासावे. पण हे स्वप्न नाही वास्तव आहे. ही गाडी टाटा मोटर्सने तयार केली असून ती अलीकडेच मायक्रोसॉफ्टच्या ‘फ्युचर डिकोडेड’ या परिषदेमध्ये सादर करण्यात आली. प्रस्तुत लेखामध्ये दिलेली तीनही उदाहरणे भविष्यातील नव्हेत तर वास्तवातील आहेत. योगर्ट तयार करणारी व अशा प्रकारे काम करणारी कंपनी आता जगात अस्तित्वात आली आहे. ही गाडीही प्रत्यक्षात आली आहे आणि तो व्हच्र्युअल आरसाही प्रत्यक्षात आला असून येत्या काही महिन्यांत अनेक मॉलमध्ये उपलब्ध असेल. या तंत्रज्ञानातील बहुतांश गोष्टी या भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केल्या आहेत, हे विशेष.
भविष्यातील महत्त्वाच्या दोन जागतिक बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यातील चीनच्या बाजारपेठेला सध्या काही समस्यांनी ग्रासले आहे. तर भारत मात्र वेगामध्ये डिजिटल होण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. त्या मार्गक्रमणेस वेगात सुरुवातही झाली आहे म्हणूनच तर फ्युचर डिकोडेडसाठी भारताची निवड करण्यात आली. मुंबईत पार पडलेल्या याच परिषदेमध्ये याची नांदी पाहायला मिळाली. पूर्वी आपण केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी बोलायचो. त्याचवेळेस काही वर्षांपूर्वी क्लाऊड नावाचे प्रकरण जन्मास आले. आता या क्लाऊड आणि अ‍ॅनालेटिक्स म्हणजेच प्रचंड मोठय़ा प्रमाणावर असलेल्या माहितीचे क्षणभरात विश्लेषण करण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांना प्राप्त झाली असून त्या बुद्धिमत्तेचा प्रवास मानवी बुद्धिमत्तेच्या दिशेने सुरू झाला आहे. त्याचीच ही सारी उदाहरणे आहेत. मात्र या संपूर्ण व्यवहारांतून माणूस उणे होत चालला आहे. म्हणजे एका बाजूस त्याचे सारे व्यवहार हे डिजिटल होत आहेत आणि दुसरीकडे जे डिजिटल होणार नाही ते टिकणार नाहीत. दुसरीकडे डिजिटल गोष्टींमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर थेट गंडांतर येणार आहे. ते नको असेल तर तुम्हाला नवा उतारा शोधावा लागेल आणि जो पर्याय शोधावा लागेल तोही डिजिटलच असावा लागेल, याचा पहिला थेट प्रत्यय या फ्युचर डिकोडेड परिषदेमध्ये आला. हाच होता खरा डिजिटल धक्का. या धक्क्याने चांगल्या अर्थाने मानवी आयुष्य डिजिटल व सुकर होत चांगले होणार आहे. त्यातील मानवी लुडबुड कमी होणार आहे. पण दुसरीकडे पर्यायाने तुम्ही डिजिटल असाल तरच सर्वार्थाने भविष्यात निभाव लागेल, हेच या परिषदेने अधोरेखित केले!

सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 10:38 am

Web Title: virtual mirror virtual things new digital lifestyle
Next Stories
1 ब्रोकोली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका टाळणे शक्य
2 पेट टॉक : श्वान लठ्ठपणाची सुदृढ बाजारपेठ
3 Healthy Living : दही कधी खावे?
Just Now!
X