आपल्याला नेहमी सतावणाऱ्या व जेरीस आणणाऱ्या सर्दीवर उपाय शोधणारे संशोधन वैज्ञानिकांनी केले असून त्यात सर्दी व पोलिओच्या विषाणूंच्या संसर्गावर प्रभाव असलेल्या संकेतावलीचा पर्दाफाश केला आहे. ही संकेतावली प्रथमच उलगडण्यात आली आहे.
 आपल्याला नेहमी होणारी सर्दी ‘ऱ्हाइनोव्हायरस’ या विषाणूमुळे होते व वर्षभरात १ अब्ज पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण होते. हा विषाणू चिकुन गुन्या व मेंदूज्वर विषाणूच्या कुटुंबातील असून आतापर्यंत त्याच्या रायबोन्युक्लिइक अॅसिडमध्ये लपलेली ही संकेतावली सापडली नव्हती. एक धाग्याच्या आरएनए विषाणूंमध्ये हेपॅटिटिस सी, एचआयव्ही व नोरोव्हायरस यांचा समावेश होतो. लीड्स विद्यापीठ व यॉर्क विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी या ऱ्हायनोव्हायरसची संसर्ग संकेतावली उलगडली असून त्यामुळे या विषाणूची लागणच थांबवता येऊ शकते. त्यामुळे या विषाणूच्या हालचाली रोखून त्याचा प्रसारही थांबवता येईल. लीड्स विद्यापीठाचे प्रा. पीटर स्टॉकले यांनी सांगितले की, रेणवीय युद्धतंत्राचा विचार केला तर या विषाणूंची संकेतावली म्हणजे छुपे संदेश असून त्यामुळेच ते शरीरात लागण करण्यात यशस्वी होतात. त्यावर आम्ही एनिग्मा मशीन शोधून काढले आहे, त्यामुळे हे संदेश रोखले जातात. हे संदेश वाचता येतात एवढेच नव्हे तर या विषाणूंना जखडून टाकता येते असे आम्ही दाखवून दिलेले आहे. एक धाग्याचा आरएनए विषाणू हा साधा व पूर्वीपासून विकसित होत आलेला विषाणूचा प्रकार असून तो जास्त सक्षम रोगजंतू म्हणून ओळखला जातो. २०१२ मध्ये लीड्स विद्यापीठाने एक धाग्याच्या आरएनए विषाणूंचा गठ्ठा पेशींच्या बाहेरच्या आ़वरणाला कसा चिकटतो हे दाखवून दिले होते. यॉर्क विद्यापीठाच्या डॉ. एरिक डाइकमन व प्रा. रेडन थ्वारोक या गणितज्ञांनी या विषाणूंची संकेतावली गणितीय अलगॉरिथमच्या मदतीने उलगडली. प्रदीप्त रेणवीय वर्णपंक्तीशास्त्राच्या मदतीने सॅटेलाइट टोबॅको नेक्रोसिस व्हायरस या विषाणूचा वापर करून आरएनए विषाणूची संकेतावली उलगडण्यात आली. आरएनएच्या मदतीने जनुकीय संदेश वाहून नेले जातात व त्यामुळे विषाणूंची प्रथिने बनतात हे माहीत होते, पण त्यातील नेमकी जनुकीय माहिती काय असते ते कळले आहे.