९१ हजार मुलांमध्ये दृष्टीदोष उघड
आठ वर्षांच्या राजूला वर्गात फळ्यावरील अक्षरे नीट दिसत नव्हती. त्यामुळे तो पहिल्या बाकावर येऊन फळ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागला. शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा पालकांना बोलावून नेत्रतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. तपासणीत राजूच्या एका डोळ्याची दृष्टी अवघी वीस टक्के राहिली होती. त्याला अँम्ब्लोपिया (एक डोळा आळशी होणे) झाला होता. रडणाऱ्या लहान बाळाला व्हिडिओ तसेच मोबाईलवर गेम दाखवून रडणे थांबत असले तरी त्याच्या दृष्टीवर यातून परिणाम होत असून हजारो लहान मुलांच्या दृष्टीला धोका निर्माण होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लहान असताना वेळोवेळी रडू लागला, की व्हिडिओ तसेच मोबाईल अथवा टीव्हीवरील गाणी दाखविल्यावर तो गप्प बसतो, हे पालकांना कळले, आणि तेव्हापासून रडू लागताच राजूच्या हातात मोबाईलचे खेळणे दिले जाऊ लागले. अगदी लहान असल्यापासून डोळ्यावर सातत्याने प्रकाश पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान झाली. पुढे प्रकाश सहन न होऊन एका डोळ्याची क्षमता कमी होऊ लागली. डोळ्यातून नैसर्गिकरीत्या येणारे पाणी बंद होऊन अनैसर्गिकपणे पाणी येऊ लागते. अशा वेळी डोळ्याच्या कडा लालसर होतात. नजर कमी होऊ लागते. जन्मल्यानंतर पहिल्या तीस ते नव्वद दिवसात बाळाची नजर स्थिर होते. या काळात तसेच पहिल्या सहा वर्षांत नियमितपणे डोळ्याची तपासणी करणे आवश्यक असते. यातून डोळ्यात टिका अथवा मोतिबिंदू असल्यास तसेच नजर कमी असल्यास ते स्पष्ट होते, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व विख्यात नेत्रशल्य विषारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
मुलाला शाळेत घालण्यापूर्वी डोळ्याची तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक असते. मात्र बहुतेक पालक अशी तपासणी तर करत नाहीतच उलट लहानपणापासून मुलांच्या हाती टॅब तसेच मोबाईल देऊन त्याचेच कौतुक करतात. यातून मुलाच्या डोळ्यावर अतिरिक्त प्रकाश पडून बरेचवेळा एक डोळा ‘आळशी’ (अँम्ब्लोपिया) होतो. सहा वर्षांच्या आत ही गोष्ट लक्षात आल्यास मुलाच्या दृष्टीची नैसर्गिक क्षमता पुन्हा वाढवता येते. तथापि त्यानंतर पूर्ण क्षमता आणणे कठीण जाते. यातून मुलांना चश्मा लावावा लागतो. २०१२-१३ मध्ये आम्ही १५०८ शाळांमधील साडेसात लाख मुलांच्या डोळ्याची तपासणी केली असता ९१ हजार मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आल्याचे लहाने यांनी सांगितले.

‘लहानपणीच मुलांच्या डोळ्यांची तपासणी केली जावी, याकरिता शालेय स्तरावर दर वर्षी तपासणी शिबिरे आयोजित करावीत, अशी शिफारस आरोग्य विभागास आपण केली होती. आता पुन्हा तो प्रस्ताव आपण आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागास हा प्रस्ताव नव्याने देणार आहोत.’
– डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता