शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असल्याने यकृताचा कर्करोग होण्याची संभावना कमी होत असल्याचे एका अभ्यासात संशोधकांना आढळले आहे. सूर्यप्रकाशामुळे त्वचेत ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी राखणे त्याचप्रमाणे दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यात मदत होते. हाडांच्या रोगांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे अनेक फायदे असून यामुळे कर्करोगासह इतर अनेक रोगांच्या उपचारामध्ये मदत होत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. याबाबत युरोपीय आणि अमेरिकी लोकांवर अधिक अभ्यास करण्यात आला असून आशियाई लोकांवर याबाबत अद्याप मर्यादित अभ्यास करण्यात आला आहे. आनुवंशिकतेनुसार ‘ड’ जीवनसत्त्वाच्या चयापचयातील प्रक्रियेत बदल होतो. त्यामुळे अश्वेत लोकसंख्येवर ‘ड’ जीवनसत्त्वाचा समान परिणाम होतो का नाही यासाठी हा अभ्यास करण्यात येत आहे. जपानमधील राष्ट्रीय कर्करोग केंद्र आणि शिगा वैद्यकीय विज्ञान विद्यापीठातील संशोधक ‘ड’ जीवनसत्त्वाचा कर्करोगावर काय परिणाम होतो यावर संशोधन करीत आहेत. यासाठी त्यांनी ४० ते ६९ वयोगटातील ३३,७३६ लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण केले.

या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी त्यांचे आरोग्य, आहार, जीवनशैली याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांची रक्तचाचणीदेखील करण्यात आली. शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाच्या प्रमाणानुसार या लोकांना चार गटांमध्ये विभाजित करण्यात आले होते. या लोकांचा सरासरी १६ वर्षांच्या कालावधीसाठी अभ्यास करण्यात आला यात कर्करोगाची ३,३०१ प्रकरणे समोर आली. धूम्रपान, मद्यपान, आहारविषयक कर्करोगांच्या जोखीम घटकांसाठी समायोजित केल्यानंतर ‘ड’ जीवनसत्त्व जास्त असणाऱ्यांमध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण कमी असल्याचे आढळले.