ड जीवनसत्त्वाने हाडांचे आरोग्य सुधारत असले तरी  स्तनाचा कर्करोग बरा करण्यातही त्याचा उपयोग होतो असे संशोधनात दिसून आले आहे. स्तनाचा कर्करोग ही जगातील महिलांमधील एक मोठी आरोग्य समस्या असून ते महिलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लवकर वयात येणे, मासिक पाळी उशिरा बंद होणे, तिशीनंतर गर्भवती होणे, कौटुंबिक इतिहास हे कर्करोगामागचे महत्त्वाचे घटक आहेत. ड जीवनसत्त्वामुळे स्तनाच्या कर्करोगाची वाढ कमी होते असे असले तरी यावर अजून संशोधनाची गरज आहे. सहाशे ब्राझिलीयन महिलांचा अभ्यास करून असे सांगण्यात आले की, ड जीवनसत्त्वामुळे कर्करोगाला आळा बसतो. जर्नल मेनोपॉजमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

रजोनिवत्तीनंतर महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यावेळीच कर्करोगाचे निदान होते. त्याचा संबंध लठ्ठपणाशीही असतो. ज्या महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाची जोखीम कमी असते असे अमेरिकेतील दी नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी या संस्थेचे संचालक जोआन पिंकर्टन यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही ड जीवनसत्त्व व स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू यांचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्या महिलांमध्ये ड जीवनसत्त्व अधिक असते त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू पावण्याची शक्यता पन्नास टक्क्य़ांनी कमी होते. त्यामुळे स्तनाचा कर्करोग असणाऱ्या महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे किंबहुना प्रतिबंधात्मक पातळीवरही ड जीवनसत्त्वाचे शरीरातील प्रमाण पुरेसे असणे आवश्यक आहे असे  संशोधकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin d breast cancer
First published on: 20-09-2018 at 00:29 IST